६ लाखांची फसवणूक आरोपींवर गुन्हा दाखल
साईमत/जळगाव /प्रतिनिधी
शहरातील डीएसपी चौकात बारदान विक्रीच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याची तब्बल ६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
शहरातील प्रजापत नगर (शनीपेठ) भागातील रहिवासी आणि व्यापारी प्रकाश श्रीराम प्रजापत (वय ५०) यांना आरोपी रविंद्र तायडे आणि त्याचे दोन साथीदार बारदान विक्री करण्याचे आमिष दाखवून फसवले. हा व्यवहार २३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते ५.३० वाजेच्या दरम्यान डीएसपी चौकातील सार्वजनिक ठिकाणी झाला.
अभियुक्तांनी प्रजापत यांच्याकडून एकूण ६ लाख रुपये घेतले, ज्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटांची २ बंडल (१ लाख रुपये) आणि २०० रुपयांच्या नोटांची ५ बंडल (५ लाख रुपये) यांचा समावेश होता. मात्र, रक्कम घेऊनही बारदान दिले नाहीत आणि संशयितांनी प्रजापत यांची फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रकाश प्रजापत यांनी २ फेब्रुवारी २०२६ रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून रविंद्र तायडे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून तपास चालू आहे.
