साईमत, जळगाव : प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीत सोळा संस्कारांपैकी विवाह हा महत्वाचा आणि तितकाच पवित्र असा संस्कार आहे. चार आश्रमांपैकी असलेला गृहस्थाश्रम हा महत्त्वाचा आणि सोबतच पती आणि पत्नी यांच्या परस्परांवषयी असलेला त्याग, समर्पण आणि ठाम विश्वास याची घट्ट आणि अतूट गुंफण आहे. मात्र, आजच्या काळात वाढलेला चंगळवाद, दिखाऊपणा, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण यामुळे आदर्श, ध्येये, एकविचार या नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे कौटुंबिक व्यवस्था ढासळत आहे. यासाठी कुटुंबाचे स्थैर्य टिकून राहण्यासाठी नैतिक मूल्यांची जपणूक करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जळगाव कौटुंबिक न्यायालयात वकिली आणि फॅमिली कॉन्सिलिंगसाठी कार्यरत ॲड. भारती वसंत ढाके यांनी केले. रविवारी, ३१ मार्च रोजी मेहरूणमधील संत नरहरी सोनार बहुद्देशीय संस्था संचालित वाघेश्वरी महिला मंडळाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर शहरातील माजी महापौर सीमा भोळे, विद्या दापोरेकर, रंजना वानखेडे, लता मोरे, सविता मोरे, पूजा पातोंडेकर आदी उपस्थित होते.
दिखाऊपणामुळे प्री-वेडिंग हा प्रकार आज अनेक समस्यांना खतपाणी घालत आहे. त्यातील अवाजवी खर्च, भडकपणा, अट्टाहास अशा विचित्र मानसिकतेमुळे समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. हे सर्व टाळता यावे, ही सामाजिक समस्या टाळता यावी, यासाठी आपण आत्मपरीक्षण करून भारतीय संस्कृती आणि तिच्या नैतिक मूल्यांचे पालन करणे आणि ते अंमलात आणणे, तितकेच महत्त्वाचे आहे. भौतिक सुखाच्या, करीयरच्या मागे न धावता वास्तविक जीवनाचा स्वीकार केल्यास अशा समस्यांना आपसूकच पायबंद घातला जाईल, असेही ॲड.ढाके यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
‘लिव्ह इन’ विवाह संस्थांना लागलेली वाळवी
आजच्या तरुणाईत सध्या ‘लिव्ह इन’ हा प्रकार वाढत आहे. या प्रकारात कुठलीच विश्वासार्हता आणि सुरक्षितता नाही. हा प्रकार विवाह संस्थांना लागलेली वाळवी आहे. त्याचे भान आजच्या तरूणाईने ठेवले पाहिजे, अशी खंतही ॲड. भारती ढाके यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या वक्त्या राजेश्री देशपांडे यांनी धर्म आणि आचरण, यासह नैतिक मूल्याविषयी मार्गदर्शन केले.
मेळाव्यात या आदर्श मातांचा झाला सत्कार
मेळाव्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इंदू सोनार, प्रमिला विसपुते, मीरा दुसाने, ताराबाई वानखेडे, सरला वडनेरे, रुख्मिणी देवरे, लता वडनेरे, सिंधू वाघ, नलिनी बोरकर, विजया सोनार यांना गुलाबपुष्प आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
यावेळी सराफ व्यवसायिक किरण पातोंडेकर, विजय वानखेडे, चंद्रशेखर वानखेडे, पंकज सोनार, प्रशांत सोनार, सुनील सोनार, जगदीश देवरे, राजेश बिरारी, हर्षल बिरारी, निलेश विसपुते यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संस्थेच्या विश्वस्त मीनाक्षी वाघ, नयना सोनार, निर्मला देवरे, गीता सोनार, मनीषा सोनार, मीनाक्षी दाभाडे, ज्योती सोनार, विद्या सोनार, प्रमिला चव्हाण, माया वडनेरे, मंगला दुसाने यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक केतकी सोनार तर सूत्रसंचालन तथा आभार वर्षा अहिरराव यांनी मानले.



