साईमत रावेर प्रतिनिधी
प्रतिनिधी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून सुटच्या नावाखाली अनेक वर्षांपासून घेत असलेली तीन टक्के सुट शनिवारी, 1 जुलैपासून बंद करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय कृषी दिनाच्या पूर्वसंध्येला रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीने घेऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांना कृषी दिनाची भेट दिली आहे. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन कार्यकारिणीची शुक्रवारी, 30 जून रोजी दुसरी बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती सचिन पाटील होते.
सोबत उपसभापती योगेश पाटील, संचालक गणेश महाजन, जयेश कियुटे यांच्यासह अधिकारी, संचालक मंडळ उपस्थित होते. बैठकीत पूर्वापार व्यापारी केळीच्या घडाच्या वेस्टेज दांड्याच्या पोटी तीन टक्के सूट घेत होते. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने केळी उत्पादक शेतकरी आपली केळी पॅकींग करुन पाठवू लागला होता. जवळपास 80 टक्के शेतकरी बांधव नवीन तंत्रज्ञानाने केळी निर्यात करीत होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना तीन टक्के का द्यावी, अशी मागणी केळी उत्पादक करीत होता. या रास्त मागणीला रावेर बाजार समितीच्या संचालकांनी सकारात्मक भूमिका घेत 1 जुलैपासून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सूट मागू नये, असा आदेश काढला. तसेच जो व्यापारी सूट मागत असेल त्या व्यापाऱ्याची तक्रार करण्यात यावी, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.
तसेच ज्या व्यापाऱ्याविरुध्द तक्रार येईल, त्याच्याविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सभापती सचिन पाटील यांनी दिला. दरम्यान, बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा तत्त्वावर बॅटरीवर चालणारे फवारणी पंप देण्यात आले. साधारणत साडे चार हजार किमतीचा पंप मात्र 2 हजार 200 रुपयात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आजमितीस सुमारे 1 हजार पंपाची उपलब्धता करण्यात आली असून जवळपास तीन ते चार हजार पंप उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती सभापती सचिन पाटील यांनी दिली. यासाठी सेवाभावी संस्थाची मदत घेणार असल्याचे सांगितले.