साईमत न्यूज नेटवर्क –
आग्रा–लखनौ महामार्गावर फतेहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात घडला असून लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक बसली. या दुर्घटनेत दोन सख्ख्या भावांसह एका महिलेचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील एक कुटुंब राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील लग्न सोहळ्यासाठी प्रवास करत होते. आग्रा–लखनौ द्रुतगती मार्गावर कारचा चालक डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने समोर असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला असून वाहनाचा मोठा भाग कंटेनरमध्ये घुसला. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात शंकर कुमार आणि त्यांचा भाऊ सुनील कुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर चालक मोहम्मद शोएब उर्फ सोहैब, परमिता कुमारी, पूजा कुमारी, राजीव कुमार उर्फ राजू आणि अयांश हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, यूपीडीए आणि रुग्णवाहिका पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून फतेहाबाद येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गंभीर जखमींना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आले.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.
