साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेला फोनवरून एकाकडून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा येथे घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, उषाबाई सुभाष चव्हाण (वय ४०) या महिला जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून बोदवड येथील इरफान सैय्यद याने शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी महिलेच्या फोनवरून कॉल करून शिवीगाळ करत ‘माझ्याविरोधात पोलिसात तक्रार दिली तर तुझ्या परिवाराला जीवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी इरफान सैय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. विनोद पाटील करीत आहे.