साईमत जळगाव प्रतिनिधी
”जो जेथे आहे तेथेच तो राहिलं. भाजपमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. माधवराजे शिंदे, ज्योतिरादित्य शिंदे, हर्षवर्धन पाटील, अशी भाजपमध्ये अनेक उदाहरणे दाखवता येतील. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये असले तरी अद्यापही त्यांच्या मुलीने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. पण जो ज्या ठिकाणी आहे तिथेच त्यांनी काम करावं. रक्षा खडसे भाजपमध्ये असतील तर त्यांनी तिथेच प्रामाणिकपणे काम करावं. एका घरात असले तरी विचार वेगवेगळे असू शकतात. अशी अनेक उदाहरणे आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी दिली.
आ.एकनाथराव खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या आरोपांवरही भाष्य केलं. रक्षा खडसे यांना भाजपमध्ये मोकळेपणाने काम करण्याची संधी मिळते का? असा प्रश्न विचारला असता खडसे म्हणाले की, 40 वर्ष काम करताना माझ्यावर कोणी आरोप केला नाही. पण अचानक माझ्यावर आरोप झाले, जमीन घोटाळ्याचे आरोप, कधी दाऊशी संबंध असल्याचे आरोप, इतके आरोप होऊ लागले, मीडिया ट्रायल झाल्या, चौकश्या होऊ लागल्या. लोकांना वाटलं इतका भ्रष्ट कसा असू शकतो? पण या सर्वांच्या मागे कोण सूत्रधार होता. हेही नंतर लोकांच्या लक्षात आले. कोण कट करतयं हे लोकांना पटत होतं. याच्या मागे कोणीतरी असल्याशिवाय एवढ सगळं होणार नाही, हेही लोकांना दिसत होतं.
पण ज्या पक्षासाठी मी इतकी वर्षे काम केलं. त्याच पक्षात माझा छळ झाला. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. माझ्याकडून राजीनामा घेतला गेला. अनेक चौकशा लावल्या, त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही. भाजपमध्ये ज्यांच्यावर मोठ-मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पक्षात येऊन स्वच्छ झाले. अडचणीच्या काळात शरद पवारांनी मला विधान परिषद सदस्य बनवून राजकीय विजनवासातून बाहेर काढले. त्यामुळे आता भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही,’ अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
जे भाजपला सोडून गेले ते पुन्हा भाजपमध्ये आले नाहीत. एकतर त्यांच निधन झालं किंवा बरेच जण घरीच आहेत. पण पुन्हा भाजपात कोणीही आलं नाही. वर्षानुवर्षे जे भाजपमध्ये आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना भाजपमध्ये अपमानास्पद वागणूक दिली जाते. 2014 ला आणि 2019 मध्ये सर्वांची मोठी मेहनत होती. त्यावेळी सरकार विरोधी वातावरण निर्माण झालं होतं. भाजपचचं सरकार येणार असल्याचे वातावरण निर्मिती झाली, त्याच काळात अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, असे ही आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले.