पहुरला शेत शिवारात वाढला चोरांचा सुळसुळाट

0
64

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर

अवकाळी पाऊस, दुष्काळ सदृश्‍य परिस्थिती, शेतमालास असलेला कवडीमोल भाव आणि उत्पन्नापेक्षा वाढलेला उत्पादन खर्च अशा विविध संकटांशी संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांना आता शेत शिवारातून शेती साहित्य चोरणाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शेत शिवारात सध्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. शेतीपयोगी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांनी तक्रारी देऊन गुन्हे नोंदविले आहेत.

अर्जुन मोतीलाल घोंगडे यांच्या खर्चाणे रस्त्यावरील गट क्रमांक १७६ या शेतातून पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले १ बोअरवेल पंप, फाईव्ह एचपी पाणबुडी कृषी पंप, थ्री एचपी कृषीपंप, १२५ लोखंडी मेखा, घन, व्हायब्रेटर यंत्र, पत्र्याची पेटी असा ८० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी त्यांनी पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
ठिबक नळ्या गेल्या चोरीला

शेतकरी सुरेश अमृत बनकर यांच्या सांगवी शिवारातील शेतातून ९५ हजार रुपये किमतीचा शेततळ्याचा प्लास्टिक कागद अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी त्यांनी पहूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापूर्वीही वडाळीचे सरपंच संजय बनसोडे यांच्या शेतात अज्ञात व्यक्तींनी ठिबकच्या नळ्या इतर माल पेटवून दिला होता. गेल्या आठवड्यात लोंढ्री येथेही तीन शेतकऱ्यांचे एक लाख रुपये किमतीच्या ठिबक नळ्या चोरीला गेल्या आहेत.

शेतकरी त्रस्त

पहूर शेत शिवारात शेतकरी पेरणीपूर्व मशागत व धूळपेरणीच्या कामात सध्या व्यस्त आहेत. तथापि शेत शिवारात होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.

महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या

एकीकडे आग ओकणाऱ्या सूर्यामुळे पिके कोमेजून जात असताना दुसरीकडे महावितरणकडून विजेचा लपंडाव अद्यापही सुरूच आहे. गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी वीज पुरवठा नियमित सुरू व्हावा, यासाठी महावितरणला निवेदन दिले. मात्र त्याचा फारसा उपयोग न झाल्याने शुक्रवारी शेतकऱ्यांनी वीज उपकार्यकारी अभियंता योगेश इंगोले, सहाय्यक अभियंता सुरेश चौधरी यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. नाचणखेडा फिडरवरील वीज पुरवठा नियमित सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

यावेळी सुरेश घोंगडे, विष्णू घोंगडे, तुषार बनकर, अमोल घोंगडे, जितेंद्र घोंगडे, हेमंत जाधव, ऋषी घोंगडे, सुरज पवार, हिरालाल लहासे, योगेश पवार, नाना घोंगडे, ईश्‍वर द्राक्षे, कृष्णा द्राक्षे, संतोष भडांगे, युवराज बनकर, समाधान घोंगडे आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here