साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
येथुन जवळील सार्वे, ता.पाचोरा येथे आणि डामरुण, ता.चाळीसगाव येथे शुक्रवारी, १७ नोव्हेंबर रोजी भरदिवसा सात घरे फोडत रोकडसह सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी लांबवून पोबारा केला आहे. भरदिवसा झालेल्या चोऱ्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत चौकशी केली.
पाचोरा तालुक्यातील सार्वे येथे भर दुपारी चारचाकीने आलेल्या चोरट्याने सुभाष विठ्ठल पाटील यांचे बंद घर फोडत काही रोकड रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले. तेथुन काही अंतरावरील भाऊसाहेब भिला पाटील यांचे तेथुन काही अंतरावरील काकासाहेब महादू पाटील यांचे घर फोडत घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त फेकत तेथुन पोबारा केला. ही घटना नगरदेवळा दुरक्षेत्राला कळताच पोलीस नाईक मनोहर पाटील, मज्जीद पठाण यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.
तेथुन चोरट्यांनी आपला मोर्चा डामरुण, ता.चाळीसगाव येथे वळविला. तेथेही दिवसाढवळ्या योगेश पांडुरंग पाटील, महेश पांडुरंग पाटील, महेंद्र ज्ञानेश्वर पाटील व विरभान अप्पा पाटील यांचे बंद घर फोडत येथुनही काही ऐवज चोरट्याने लांबविला. घटनेची माहिती कळताच चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरदे, पो.हे.कॉ.जयेश पवार, विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन तपास चक्रे फिरविली.