शेतमजुरांच्या प्रश्‍नांवर दर महिन्याला आंदोलन करणार

0
53

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील तहसीलदार कार्यालयावर लालबावटा शेतमजूर युनियन आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी आताच्या सरकारच्या काळात शेतमजूर, आदिवासी, असंघटित कामगार व दलित यांच्या प्रश्‍नांकडे सरकार लक्ष देत नाही. याकडे सरकारने लक्ष द्यावे म्हणून यापुढे दरमहा शेतमजूर युनियनतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे नेते अमृत महाजन, जिल्हा सचिव वासुदेव कोळी आणि जिजाबाई राणे यांनी केले.

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आदिवासी आणि कष्टकरी लोकांकडे अजिबात लक्ष देत नाही. अदाणी व अंबानी यासारख्या उद्योगपतींकडेच जास्त लक्ष देत आहे. महागाई, बेरोजगारी तसेच महिलांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. गुजरातमध्ये तर बिल्कीस बानो महिलेवर अत्याचार केलेल्या आरोपींना जन्मठेप झाली. परंतु त्या आरोपींना गुजरात सरकारने मोकळे केले. काहींनी तर त्यांचा सत्कारही केला. मणिपूरलाही दोन आदिवासी महिलांवर अत्याचार झाला. त्याची साधी दखलही केंद्र सरकारने घेतलेली नाही. देशात अशा अनेक अत्याचाऱ्याच्या घटना घडत आहेत.

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत शेतमजुरांची मानधन प्रकरणे नापास करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे बरेच गरजू लाभार्थी आवश्‍यक लाभापासून वंचित राहत आहेत. योजनेंतर्गत मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंज्या स्वरुपाचे आहे. म्हणून कमीत कमी तीन हजार रुपये मानधन मिळावे. त्याचप्रमाणे श्रावणबाळ योजनेअंतर्गत मतदान कार्ड आधार कार्ड तफावत असल्यास मेडिकल ऑफिसर यांनी केलेले वैध धरावे, गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारचे दोनशे रुपये कमी मिळत आहेत ते फरकासह अदा करावा, रहिवासी पुरावा म्हणून मतदान कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी १ वैध समजावा, मेडिकल सर्टिफिकेट असल्यास प्रकरण नापास करू नये, अपूर्णता प्रकरणातील अपूर्णता त्रुटी पूर्ण करून ती परत फेर चौकशीसाठी ठेवणे, जंगल गायरान जमिनीवरील भूमी आदिवासी यांची अतिक्रमणे नियमाकुल करावी, खेडोपाडी बेघर शेतमजुराला जागा उपलब्ध करून द्या, किमान एक हजार चौरस फूट जागा घरकुलासाठी मिळावी. तसेच बांधकामासाठी किमान पाच लाख रुपये निधी मिळावा, आदिवासींचे प्रलंबित वनदावे मंजूर करा, शहरी भागातही दारिद्य्र खालील लोकांना घरकुल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करावा, ग्रामीण भागात शेतमजूर राहत असलेली जागा शहरी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या नावे घराची जागा करा आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी स्वीकारले. श्रावणबाळ व इंदिरा गांधी प्रकरणात त्रूटी असेल तर तशी माहिती अर्जदारांना कळविले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

मोर्चात जीजाबाई राणे, ठगूबाई भोई, सुमन माळी, विश्‍वास पाटील, रतिलाल भिल्ल, विमल माळी, शांताराम पाटील, सुमन चौधरी, सुमन माळी, मंगल धनगर, लता शेटे, नजमाबी गफार, गणेश माळी, चंद्रकला माळी आदींसह इतरांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here