साईमत/ न्यूज नेटवर्क/ यावल :
आदिवासींशिवाय जंगल नाही आणि जंगलावाचून आदिवासी नाही, ही संकल्पना मांडून त्यांचे व जंगलाचे महत्व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. त्यांनी यावल येथे यावल वन विभागाच्या आयोजित कार्यक्रमात उपस्थित आदिवासी बांधव, वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यावल पूर्व वनक्षेत्रात वन महोत्सव सप्ताहानिमित्त आदिवासी बांधव, ग्रामस्थ व शेतकरी तसेच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना पाच दिवसीय गौण वनोपजाचे उत्पादन, व्यवस्थापन आणि कौशल्य वाढविण्याचे प्रशिक्षण फाउंडेशनचे अध्यक्ष विरेंद्र छाजेड आणि त्यांच्या चमूकडून नुकतेच देण्यात आले.
प्रशिक्षणार्थी आदिवासी ग्रामस्थ, शेतकरी, बचत गट सदस्य, संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वन कर्मचारी यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यावल उपवन संरक्षक जमीर शेख, एकात्मिक आदिवासी विकासाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासींच्या विकासासाठी सर्व यंत्रणाच्या समन्वयासह यावल वन विभाग कटीबध्द राहिल, अशी ग्वाही जळगाव येथील यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी दिली.
वन महोत्सवानिमित्त ‘एक पेड मॉ के नाम’ संकल्पनेतून मोफत वृक्षाचे वाटप केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी डोंगरदे येथे आश्रमशाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. तसेच मनवेल येथील आदिवासी आश्रमशाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
यांनी घेतला सहभाग
कार्यक्रमात आदिवासी ग्रामस्थ, यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, यावल पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे, यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण, निर्मुलन यावल तसेच वन कर्मचाऱ्यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला.