साईमत, यावल : प्रतिनिधी
यावल-भुसावळ रस्त्यावर यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात, यावल तहसील कार्यक्षेत्रातील बिन शेती परवानगी मिळालेल्या, बिन शेतीची परवानगी न मिळालेल्या गट नंबरमधून तहसील आणि तलाठी कार्यालयाला सुटी असते. त्या दिवशी विकासक आणि शेतमालक उंच टेकड्यांचे जेसीपी मशिनरीच्या साह्याने उत्खनन व सपाटीकरण करून त्या मातीची सर्रासपणे वाहतूक करून आर्थिक कमाई करून शासनाची लाखो रुपयाची रॉयल्टी बुडवित आहे. त्यामुळे यावलच्या तहसिलदारांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यामार्फत जागांचे मोजमाप करून विकासक आणि शेत मालकाविरुद्ध दंडात्मक, फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
यावल-भुसावळ रस्त्यावर बिनशेती परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या एका गट नंबरमध्ये बिनशेतीची परवानगी मिळण्याचा आधीच उंच भागाचे जेसीपी मशिनरीच्या सहाय्याने उत्खनन करून व जेसीबी मशीनच्या सहाय्यानेच ट्रॅक्टर, डंपरमध्ये माती भरून इतरत्र ठिकाणी बेकायदा सर्रासपणे वाहतूक करण्यात आली. पुढे सुद्धा वाहतूक होणार आहे. त्यात शेतमालक आणि विकासकांनी यावल महसूलची शुद्ध दिशाभूल सोबतच फसवणूक करून सुटीच्या दिवशी सर्रासपणे मातीची वाहतूक करून लाखो रुपयांची कमाई करून शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवली आहे.
यावल नगरपालिकेच्या हद्दीत अनेकांना जमिनीस रहिवास प्रयोजनार्थ बिनशेती परवानगी मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी जळगाव, तहसीलदार यावल व नगरपरिषद यावल यांनी घालून दिलेल्या सर्व अटी, शर्तीची पायमल्ली करीत विकासकांनी आपल्या सोयीनुसार आपले उद्दिष्ट सुरू ठेवले आहे. त्यात मात्र प्लॉट घेणाऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक होत आहे. त्यांना प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच काही विकासकांनी तर मूळ शेत मालकाच्या नावावरच प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवसाय सुरू ठेवून विविध टॅक्स बुडवित असल्याने याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशीसह कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.