भूषण कॉलनीत घरफोडी; ३३ हजारांचा मुद्देमाल गायब
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील भूषण कॉलनी परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या घरफोडीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घर उघडे असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लॅपटॉप व तीन मोबाईल असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण कॉलनीतील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या एका तरुणाच्या घरात कोणीही नसताना घराचे मुख्य दार उघडे असल्याचे पाहून चोरट्याने आत प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तूंवर डोळा ठेवत चोरट्याने लॅपटॉप आणि तीन मोबाईल असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
घटना लक्षात येताच संबंधित फिर्यादीने तातडीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी १८ एप्रिल रोजी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी घर बंद ठेवताना अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
