
माणुसकी समुहाच्या प्रयत्नांमुळे हरवलेल्या युवतीचे नातेवाईक सापडले; परंतु मुलीने घरी जाण्यास दिला नकार
साईमत/पाळधी (ता.जामनेर) /प्रतिनिधी :
येथील २२ वर्षीय पूजा निलेश खुर्पे ही युवती घरातून न सांगता बाहेर पडल्याने कुटुंबीयांची झोप उडाली होती. तिचा शोध सुरु असतानाच ती सिल्लोड शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात बेवारस अवस्थेत आढळली. रात्रीच्या वेळी एकटी फिरत असल्याचे लक्षात येताच सिल्लोड शहर पोलिसांनी तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ तिला ताब्यात घेतले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेशराव उदार यांनी तिच्या ओळखीबाबत चौकशी केली असता, ती योग्य पत्ता सांगू शकत नव्हती. त्यामुळे त्यांनी सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे सुमित पंडित यांच्यामार्फत तिला माणुसकी वृद्ध सेवालय (जटवाडा रोड, सिल्लोड) येथे पुनर्वसनासाठी दाखल केले. सेवालयाच्या संचालिका पुजा पंडित यांनी तिच्या काळजीची जबाबदारी स्विकारत समुपदेशनाद्वारे विचारपूस केली.
दरम्यान, तिचे फोटो आणि माहिती माणुसकी ग्रुपच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. त्यावरून जळगाव येथील विकास चौधरी यांनी तिची ओळख पटवली आणि ती पाळधी गावची असल्याचे सांगितले. तात्काळ पहुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे, तसेच बीट अंमलदार सुभाष पाटील यांच्या मदतीने तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. चौकशीत समोर आले की, तिचे नाव ‘साक्षी’ नसून पूजा खुर्पे असून, तिच्या हरवल्याची नोंद पहुर पोलीस ठाण्यात आधीच करण्यात आली होती.त्यानंतर तिची आई व भाऊ सेवालयात आले.
मात्र, पूजा घरी जाण्यास नकार देत म्हणाली, ‘मी इथे सुरक्षित आहे, मला येथेच राहू द्या; नाहीतर मी आत्महत्या करीन.’ या परिस्थितीत पोलिसांनी तिचे मत मान्य करत, वरिष्ठांच्या निर्देशानुसार तिला सेवालयातच ठेवण्यात आले.
तिच्या आईने सांगितले की, “पूजाचा विवाह निलेश खुर्पे यांच्याशी झाला आहे. परंतु कौटुंबिक मतभेदांमुळे नवऱ्याने सांभाळ केला नाही.
त्यामुळे आम्ही तिला पाळधी येथे आणून ठेवले होते. मानसिक ताणामुळे ती पुन्हा घरातून निघून गेली.” आईच्या म्हणण्यानुसार, पूजाचे पूर्वी वर्धा व नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार झालेले आहेत.सध्या माणुसकी समुहाच्या मदतीने तिला औरंगाबाद घाटी रुग्णालयात मानसिक आरोग्य उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून, उपचारानंतर पुन्हा माणुसकी वृद्ध सेवालयात पुनर्वसनासाठी ठेवले आहे.या संपूर्ण प्रकरणात सिल्लोड पोलीस, पहुर पोलीस, माणुसकी समूह आणि सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि समन्वय ही खरी माणुसकी जिवंत ठेवणारी ठरली आहे.


