विदर्भात उन्हाचा तडाखा तर खान्देश-मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी; आयएमडीकडून अनेक भागांना सतर्कतेचा इशारा
साईमत / मुंबई
राज्यात सध्या उन्हाळा आणि पावसाचा अनोखा संगम पाहायला मिळत असून हवामानात मोठे बदल नोंदवले जात आहेत. एका बाजूला विदर्भात कडाक्याचे ऊन नागरिकांना हैराण करत असताना, दुसरीकडे खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरींची हजेरी लागत आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, २० ते २४ एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागांमध्ये विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. झाडाखाली, मोकळ्या जागेत, पाण्याजवळ तसेच लोखंडी वस्तूंच्या परिसरात उभे राहणे टाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. उघड्यावर मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित निवारा उपलब्ध नसल्यास जमिनीवर न झोपता पाय एकत्र करून बसण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाला ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य यंत्रणांमार्फत जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांनी विजांच्या काळात शेतातील कामे टाळावीत, बांधकाम स्थळांवरील कामे तात्पुरती थांबवावीत तसेच मोठ्या गर्दीचे कार्यक्रम पुढे ढकलावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे.
