फुलगाव शिवारातील शेतकऱ्यांची ‘वाट’ बिकट

0
11

साईमत/ न्यूज नेटवर्क । वरणगाव ।

शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेत शिवारातील रस्ते तयार करण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, फुलगाव व पिंप्रीसेकम भागातील शेतकऱ्यांच्या शेताची वाट बिकट झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना अडचणीवर मात करीत शेती शिवार गाठावे लागत आहे. दीपनगर प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीमालाची शेतीच्या बंधाऱ्याहून थेट बाजारपेठेत सुलभ वाहतूक व्हावी, यासाठी शेत शिवारातील रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, तालुक्यातील फुलगाव येथील बहुतांश शेतकऱ्यांची शेती फुलगाव व पिंप्रीसेकम शिवारात आहे. या शेत शिवाराकडे एक फुलगाव ते पिंप्रीसेकम तर दुसरा फुलगाव ते दीपनगर वीज निर्मितीकडे कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे मार्गाजवळून जाणारा असे दोन मार्ग आहेत. मात्र, यापैकी दीपनगर वीज निर्मितीकडे कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे मार्गालगतच्या मार्गाची दहा ते बारा वर्षापासून प्रकल्पाच्या माध्यमातून दुरुस्तीच झाली नसल्याने या मार्गाच्या दोन्ही बाजुच्या साईडपट्ट्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. तसेच रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात चाळण झाल्याने या मार्गावरून मार्गक्रमण करणारे दुचाकीधारक शेतकरी, कर्मचारी यांना मोठ्या कसरतीने या मार्गावरून रात्री-अपरात्री मार्गक्रमण करावे लागत आहे.

इतकेच नव्हे तर शेती कामासाठी बैलगाडीने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैलाच्या खुरानांही इजा व जख्मा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्येकडे दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने संतापयुक्त आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे दीपनगर वीज निर्मितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

आ.संजय सावकारे यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

फुलगाव ते दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पाकडे जाणाऱ्या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्यालगतच जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे खोदकामाची मातीही रस्त्यावर आली असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी रवींद्र भागवत कोल्हे, वासुदेव चौधरी, विकास पाटील यांच्यासह किमान ५० शेतकऱ्यांनी वीज निर्मिती प्रकल्पाचे प्रकाशगड येथील चेअरमन यांच्याकडे रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन व अर्ज दिला आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही.

यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी तालुक्याचे आ.संजय सावकारे यांच्यासमोर आपल्या व्यथा व्यक्त केल्या. तेव्हा त्यांनी तातडीने मुंबई येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here