Vegetables In The Monsoon Season : पावसाळी हंगामातील रानभाज्यांची विविधता ८० स्टॉलमधून रसिकांसमोर

0
20

रानभाजी खा… निरोगी रहा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शहरातील मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथे प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र जळगाव-पाल आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवात जिल्ह्याभरातून आलेल्या शेतकरी गटांसह महिला बचत गटांनी पारंपरिक पद्धतीने पिकविलेल्या रानभाज्यांचे आणि प्रक्रिया उद्योगाचे तब्बल ८० स्टॉल लावून पावसाळी हंगामातील विविधतेचा मेवा रसिकांसमोर मांडला. महोत्सावाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी यावेळी विविध रानभाज्यांपासून बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्यातर्फे ७५ गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीची दप्तरे वाटपही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी महिलांनी रान मेवा भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

बहिणींनी बांधल्या पालकमंत्र्यांना राख्या

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर रानभाजी महोत्सवात सहभागी बहिणींनी राखी पौर्णिमेनिमित्त पालकमंत्र्यांना राखी बांधून भावा प्रतीचा स्नेह दाखवून दिला. पालकमंत्र्यांनी आपल्या सर्व बहिणींच्या मदतीसाठी कायम तत्पर असल्याचे बोलून दाखविले. पावसाळी हंगामात मिळणाऱ्या भाज्यांपासून विविध पदार्थ बनवून ‘रानभाजी खा… निरोगी रहा’ हा मूलमंत्र सर्वांनी स्वीकारावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी आ. सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष गौरव सापळे, प्रकल्प प्रमुख योगेश भोळे, सचिव देवेश कोठारी, महेश सोनी, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाककला स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

महोत्सवात यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक आदिवासी नृत्य व वाद्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले. ग्राहकांसाठी रानभाज्यांची विक्रीबरोबरच विविध रानभाज्यांच्या पाककृतींची माहिती देण्यात आली. पाककला स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला. सूत्रसंचालन मॉडेल अधिकारी (स्मार्ट) श्रीकांत झांबरे तर आभार प्रकल्प उपसंचालक भरत इंगळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here