साक्री तालुक्यातील मराठे कुटुंबाची तिसरी पिढी राष्ट्रसेवेसाठी तत्पर

0
14

साईमत, साक्री : प्रतिनिधी

जेष्ठ विधिज्ञ ॲड.उत्तमराव मराठे यांचा नातू आणि ब्रिगेडियर हितेंद्र मराठे SM *(सेना मेडल,बार टू) यांचा मुलगा लेफ्टनंट सौरभ हितेंद्र मराठे यांस चेन्नई येथील OTA (ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी) येथे अतिशय खडतर पद्धतीचे प्रशिक्षण पूर्ण करून काल दि.९ सप्टेंबर २०२३ रोजी सैन्यदलातील शानदार अश्या दिक्षांत समारंभात राष्ट्रपती कमिशन प्राप्त झाले. लेफ्टनंट सौरभ यांनी सुरूवातीला औरंगाबाद येथील SPI सर्व्हिसेस प्रिप्रेटरी इन्स्टिट्यूट येथून सेनादलातील अधिकारी पदाचे प्राथमिक शिक्षण घेतले त्यानंतर इंजीनियरिंग बरोबरच सेनादलासाठी अधिकारी पदाच्या परीक्षा देखील देत होता,मागील वर्षी सौरभला SSB उत्तीर्ण करण्यात यश आले. आक्टो. २०२२ चेन्नई येथील OTA (ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी) येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. हा दिक्षांत समारंभ भारताचे सेनाध्यक्ष,जनरल श्री.मनोज पांडे यांच्या हस्ते पार पडला. तत्पूर्वी लेफ्टनंट सौरभ यांस त्यांच्या कोर्स मधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.या दोन्ही समारंभांसाठी त्याचे आजोबा ॲड.उत्तमराव मराठे व त्यांचे संपूर्ण कुटुंब तसेच पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. सौरभचे पणजोबा कै.वंजी नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. तसेच तालुक्यातील नामवंत शेतकरी होते, ब्रिगेडियर हितेंद्र मराठे SM * (सेना मेडल,बार टू) यांनी औरंगाबाद येथील SPI (सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट,औरंगाबाद) मधून सशस्त्र दलात भरती होण्याचे त्यांचे स्वप्न साकार केले. त्यांच्या प्रेरणेमुळे नंतर ब्रिगेडिअर हितेंद्र मराठे यांचा मुलगा सौरभ देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन SPI मध्ये दाखल झाला.

SPI औरंगाबाद येथे सेनादलातील अधिकारी पदाच्या परीक्षेचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. त्याने नंतर त्याने कॉम्प्युटर इंजीनियरिंग पूर्ण करून वडिलांप्रमाणेच सेना अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न नेहमीच उराशी बाळगून होता. कॉम्युटर इंजिनिअरिंग नंतर परदेशात मोठ्या पगारावर नोकरीची संधी उपलब्ध असतांनाही त्याने देशप्रेमाने प्रेरित होऊन वडिलांप्रमाणे सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. भारतीय सेनादलातील अधिकारी पदाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांस सैन्यदलाची SSB परीक्षा म्हणजे अतिशय कठीण निवड चाचणीत स्वतःची क्षमता व पात्रता सिद्ध करावी लागली आणि त्यानंतर O T A चेन्नई येथील ट्रेनिंगसाठी निवड करण्यात आली.

आर्मी ऑफिसर या नात्याने ब्रिगेडियर हितेंद्र मराठे यांनी आधीच खूप उंच भरारी घेतली आहे. त्यांना दोन वेळा अतुल्य शौर्य गाजविल्याने सेनामेडलने गौरविण्यात आले आहे. प्रथम सेनामेडल (शौर्यपदक) त्यांना १९९८ मध्ये आसाम मध्ये कॅप्टन पदावर कार्यरत असताना उल्फा कमांडरसह चार दहशतवाद्यांचा खातमा केल्याबद्दल मिळाले होते व द्वितीय सेना मेडल हे सन २००३ साली जम्मू-काश्मीरच्या द्रास सेक्टरमध्ये टोलोलींक म्हणजेच कारगिलच्या पाठीमागच्या बाजूस पाकिस्तानच्या सैन्याने काबीज करून ठेवलेल्या भुभागावर अनेक पोस्ट(छावण्या) तयार करून ठेवल्या होत्या. कर्नल पदावर कार्यरत असताना ब्रिगेडियर हितेंद्र मराठे यांनी ऑपरेशन पराक्रम ही मोहीम राबवून पाकिस्तानी सैन्याच्या त्या सर्व पोस्ट (छावण्या) उद्ध्वस्त केल्या व तो सर्व भूभाग भारताच्या ताब्यात घेतल्याबद्दल दुसरे राष्ट्रपती सेनामेडल त्यांना प्राप्त झाले, सलग दोन वेळा राष्ट्रपती सेनामेडल (शौर्यपदक) मिळविण्याचा बहुमान फारच कमी सेना अधिकाऱ्यांना प्राप्त होत असतो. ब्रिगेडियर हितेंद्र मराठे यांच्यामुळे साक्री तालुका व धुळे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा मान भारतीय सेनेत वाढला आहे. मागील वर्षी त्यांना ब्रिगेडियरपदी बढती मिळाल्यावर तालुक्यातील, जिल्ह्यातील अनेक सामाजिक,राजकीय व शैक्षणिक संस्था तसेच अनेक गांवातील ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. आता लेफ्टनंट सौरभला वडील ब्रिगेडियर हितेंद्र मराठे यांच्या प्रमाणेच आणखी उंच झेप घेण्याचे आव्हान स्वीकारून देशाच्या संरक्षणासाठी कार्य करण्याची संधी प्राप्त झाली आहे . लेफ्टनंट.सौरभ मराठे हे धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र मराठे तसेच साक्री पंचायत समितीचे माजी उपसभापती व शेतकरी सहकारी संघाचे संचालक ॲड.नरेंद्र मराठे, व्हिडिओकॉन कंपनीचे जनरल मॅनेजर हरिश्चंद्र मराठे आणि महेंद्र मराठे यांचे पुतणे आहेत. लेफ्टनंट सौरभ मराठे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे व कुटुंबीयांचे अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. साक्री तालुक्यासह धुळे जिल्हाला सैन्यात पिता पुत्रांना अधिकारी पद व यश मिळाल्याने साक्री तालुक्यासह धुळे जिल्ह्याच्या शिरपाचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here