यावलच्या तत्कालीन तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत तहसीलदारांनी मागितला खुलासा

0
4

साईमत, यावल : प्रतिनिधी

येथील तत्कालीन तलाठी तथा रावेर तालुक्यात ऐनपूर येथे कार्यरत शरद विठ्ठल सूर्यवंशी तसेच तत्कालीन मंडळ अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याबाबत यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी लेखी पत्र काढून तीन दिवसाच्या आत समक्ष खुलासा सादर करावा, असे कळविले आहे.

दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यावल येथील गट नंबर ६७६ ला तात्पुरती बिनशेती आदेशातील नियम, अटी शर्तीतील अनुक्रमांक २८ चे उल्लंघन केल्याबाबत व सक्षम अधिकाऱ्याची अंतिम सनद नसताना भूखंडाचे पाने ओपन केल्याबाबत यावल तहसील कार्यालयात तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रार अर्जाच्या अनुषंगाने अर्जाबाबत खुलासा कार्यालयात तीन दिवसाच्या आत समक्ष सादर करावा. खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास आपल्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही दिलेल्या पत्रात यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी नमूद केले आहे.

यावल येथील पंकज श्रावण सोनार, अनिल मधुकर मोरे यांनी ८ जानेवारी २०२४ रोजी यावल तहसीलदार, संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केले होते. यावल नगरपरिषद हद्दीतील गट क्र.६७६ ला जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मार्च २०१४ रोजी तात्पुरता १ वर्षाकरिता बिनशेती आदेश मंजूर केला होता. त्या आदेशामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशातील अटी शर्ती नियम क्र.२८ मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय भुखंडाची पाने उघडण्यात येऊ नये म्हणजेच सातबारा उतारे तयार करण्यात येऊ नये, असे स्पष्ट नमूद असताना यावल येथील तत्कालीन तलाठी शरद विठ्ठल सूर्यवंशी आणि यावलच्या तत्कालीन मंडळ अधिकाऱ्याने जागामालक यांच्याशी संगनमत व आर्थिक व्यवहार करून गट क्र.६७६ बिनशेती अंतिम आदेश नसताना भूखंडाची पाने सातबारे उतारे ३० जून २०१४ रोजी नोंद क्र. १५३४८ याप्रमाणे बेकायदेशीर भूखंडाची पाने उघडली आहे.

तलाठी शरद सूर्यवंशी व तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांनी शासनाची महसूल खात्याची व जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील संदर्भीय विषयास अनुसरून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करुन तलाठ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी कागदपत्रांसह तक्रार दिली आहे. त्यानुसार तक्रार अर्जाची दखल घेत यावलच्या तहसिलदारांनी तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे कळविल्याने पुढील कार्यवाही काय? याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here