साईमत / ठाणे
शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी खऱ्या अर्थाने ‘आधार’ ठरत आहे. ठाणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात तब्बल २ हजार ५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि अर्जांचा तातडीने निपटारा यांसारखे महत्त्वाचे सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. याशिवाय, सामंजस्य करार (MoU) आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून विविध रुग्णालये, धर्मादाय संस्था व दात्यांचे सहकार्यही मिळत आहे. त्यामुळे निधी वितरणात पारदर्शकता वाढून मदतीचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे.
या निधीतून कॉक्लियर इम्प्लांट (२ ते ६ वयोगट), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त उपचार, नवजात शिशूंचे आजार, डायालिसिस, केमोथेरपी/रेडिएशन यांसारख्या एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
दरम्यान, बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे CSR अंतर्गत विशेष निधी उपलब्ध होणार असून गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण उपचार सुलभ होणार आहेत.
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील ४० हजार ७७६ रुग्णांना एकूण ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात आली. त्यापैकी ठाणे जिल्ह्यातील २,५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले आहे.
गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
