साईमत, धुळे : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांविषयी वेगवेगळ्या माध्यमातून कृतज्ञताही व्यक्त करतात. शहरातील न्यू सिटी शाळेतील माजी विद्यार्थी गजानन जोशी यानेही शिक्षक व्यंकटेश यशवंत दाबके यांच्याविषयी आगळीवेगळी कृतज्ञता व्यक्त केली. त्याने शिक्षक दाबके यांचे नाव चक्क नभांगणातील एका ताऱ्याला देण्याचा प्रस्ताव इंग्लंडमधील इंटरनॅशनल स्टार रजिष्ट्री संस्थेला पाठविला होता. या संस्थेने प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे शिक्षक यशवंत दाबके यांचे नाव आता एका ताऱ्याला देण्यात आले आहे. माजी विद्यार्थ्याने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकाला अशी अनोखी भेट दिल आहे.
शहरातील न्यू सिटी हायस्कूलमध्ये असताना व्यंकटेश यशवंत दाबके विज्ञान व गणित विषय शिकवत होते. त्यांच्या हाताखाली हजारो विद्यार्थी घडले. २००५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. ते आता कुटुंबासह पुण्यात स्थायिक झाले आहे. त्यांचा माजी विद्यार्थी गजानन माधव जोशी हे ऑस्ट्रेलियात संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. गजानन जोशी हे सेवानिवृत्त शिक्षक दाबके यांच्या अधूनमधून संपर्कात होते. आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गजानन जोशी यांनी यशवंत दाबके यांचे नाव एका ताऱ्याला देण्याचा प्रस्ताव इंग्लंडमधील स्टेलर स्टार रजिष्ट्री संस्थेला पाठविला. या संस्थेने प्रस्तावाची तपासणी केली. तसेच निर्धारित शुल्क भरल्यानंतर स्टेलर स्टार रजिष्ट्री संस्थेने शिक्षक व्यंकटेश दाबके यांचे नाव एका ताऱ्याला देत असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र गजानन जोशी यांना पाठविले.
इंग्लंडच्या स्टेलर स्टारकडे नाव देण्यासाठी केली नोंदणी
स्टेलर स्टार रजिष्ट्रीकडे नोंदणी असलेला हा तारा एक्स्ट्रा ब्राइट स्टार आहे. त्याला आता व्यंकटेश यशवंत दाबके धुळे, महाराष्ट्र असे नाव देण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकाला दिलेली ही भेट म्हटली तर वावगे ठरणार नाही. या नोंदणीचे प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. एखाद्या शिक्षकाचे नाव ताऱ्याला देण्याची ही पहिलीच घटना आहे.