साईमत, धुळे : प्रतिनिधी
नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रस्तरावर प्रधानमंत्री मत्स्यसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. पारंपरिकरित्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना प्रशिक्षण देत आधुनिक पद्धतीने मत्स्य व्यवसाय करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून या व्यवसायिकांना उभारी देण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शिरपूर येथे केले.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंवर्धन योजना, मत्स्य व्यवसाय नाशिक विभाग व आवलामाता प्राथमिक भूजलाशयीन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मत्स्य व्यवसाय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, राहुल रंधे, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त एस पी वाटेगावकर, धुळे जिल्हा मत्स्यव्यवसाय अधिकारी अविनाश गायकवाड तसेच अवलामाता प्राथमिक भूजलाशयीन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण शिरसाट, मार्केट कमिटीचे मिलिंद पाटील, सरपंच दिगंबर पाटील,उपसरपंच राहुल रंधे, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.
