मुलाने बापाच्या कष्टाचं पांग फेडले

0
3

बारामती :

घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची, वडील अशिक्षित असल्याने गवंडी कामगार. मात्र, शिक्षणाची आवड, मनात जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवल्याने बारामतीतील शंकर रामचंद्र चव्हाण हा युवक आता थेट अमेरिकेत उच्च शिक्षण घेणार आहे. शंकर हा आयआयटी गुवाहाटीमधून पदवी घेऊन एम.एस. या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना होत आहे. अनेक मुलांमध्ये आदर्श निर्माण करेल अशीच शंकरची कहाणी आहे.

तेलंगणा राज्यातून उपजीविकेसाठी रामचंद्र चव्हाण हे बारामतीत कामानिमित्त स्थायिक झाले. बारामतीमध्ये ते गवंडी काम करू लागले. गवंडीकाम करता करता त्यांनी मुलगा शंकर याला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. आपण स्वतः अशिक्षित आहोत परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि आयुष्यात मोठे व्हावे, आपले नाव कमावावे अशी त्यांची इच्छा होती. तसेच दररोज काम केले तरच प्रपंच चालेल, अशी रामचंद्र चव्हाण यांची स्थिती होती.

मात्र, अशा प्रकारच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतूनही ते मुलाला शिकवत राहिले. त्यांचा मुलगा शंकर हा ही तितकाच खडतर परिश्रम करणारा आहे. शंकरनेही आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवत मन लावून अभ्यास केला आणि आयआयटी गुवाहाटी मधून इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशनची पदवी मिळवली. अत्यंत हुशार असलेल्या शंकरला अमेरिकेत न्यूयॉर्क येथे उच्च शिक्षणासाठी संधी मिळाली असून आज तो पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना होत आहे.

शंकरला अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार असून त्या माध्यमातून तो परदेशातील उच्च शिक्षण घेणार आहे. जिद्द चिकाटी व कठोर परिश्रम केल्यास यश नक्कीच प्राप्त होते याचे जिवंत उदाहरण शंकर याने समाजासमोर ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here