दुकानदाराने उघड्यावर फेकलेले कालबाह्य खाद्यपदार्थ शाळकरी विद्यार्थ्यांनी चाखले

0
3

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

व्यावसायिक दुकानदाराने कालबाह्य झालेला खाद्यपदार्थाचा माल सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात उघड्यावर फेकल्याने शाळकरी मुलांनी त्याची चव चाखली. अशावेळी ते खाद्यपदार्थ खाणाऱ्या शाळकरी मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याप्रकरणी अन्न औषध प्रशासनाकडून कधी कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहणार आहे.

शहरातील स्टेशन रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्याकडून आपल्या दुकानातील एक्सपायरी झालेला म्हणजेच कालबाह्य झालेला खराब खाद्य पदार्थांचा माल शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणात फेकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे शहरातील लहान वयोगटातील शाळकरी मुलांनी कालबाह्य झालेल्या खाद्यपदार्थांची तसेच शितपेयाची चव चाखत असल्याचे समोर आले आहे. गोपाल नमकीन, बालाजी नमकीन, थंड पेय, अमर घी, फंटाचे बाटली पटांगणात उघड्यावर फेकण्यात आल्याचे आढळून आले होते. हा कालबाह्य झालेला खाद्यपदार्थ माल चिमुकल्या शाळकरी मुलांनी खाल्ल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याप्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे.

प्रांगणात नेहमीच अनेक दुकानदार कालबाह्य झालेला माल उघड्यावर फेकतात. ही बाब सर्वश्रुत असूनही प्रशासनाच्या नजरेत मात्र ही बाब कशी लागते, हा संशोधनाचा विषय ठरतो. अनेक छोट्या-मोठ्या दुकानात कालबाह्य झालेला शितपेय, कुरकुरे आदी सामान विकला जातो. लहान मुले तो खातात तर काही दुकानात कालबाह्य झालेला माल तो विक्री न करता त्याला उघड्यावर फेकून देतात. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची अन्न औषध प्रशासनाकडून कधीही तपासणी केली जात नाही, ही बाबही यावरुन उघड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here