जळगाव जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रयत्नशील : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
साईमत। जळगाव । विशेष प्रतिनिधी
जळगाव शहर महानगरपालिका कर्जात असणे हे अतिशय वेदनादायी व मनातील शल्य होते. मनपाचा कर्जाचा हप्ता हुडकोकडे जात असल्याने मनपाच्या कर्मचाऱ्यांचे नियमित पगार होऊ शकत नव्हते. मुलभूत विकासासाठी निधीची चणचण भासत होती. आज जर हिशोब केला तर जळगाव शहर १२०० कोटी रूपये कर्जाच्या खाईत राहिले असते. या मोठ्या महासंकटातून शहराला बाहेर काढू शकलो याचे समाधान असल्याच्या भावना आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी व्यक्त केल्या. साईमतच्या श्री गणेश आरतीचे मानकरी म्हणून आ. भोळे उपस्थित होते. त्याचवेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. इंद्रायणी मिश्रा यांची सुध्दा विशेष उपस्थिती होती. जिल्ह्यात किरकोळ बाबीमुळे रखडून पडलेल्या कामांसाठी पॅटर्न म्हणून नावीन्यपूर्ण दालन सुरू केले असून या माध्यमातून प्रभावी व रिझल्ट ओरिएंटेड काम दाखविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
आ. राजूमामा भोळेंना निरूपद्रवी म्हणून मिळतेय पसंती
आ. राजूमामा भोळे यांनी आरतीचे मानकरी म्हणून साईमतला दिलेल्या उपस्थितीवेळी शहराच्या विकासाच्या बाबतीत पुढे बोलतांना नमूद केले की, जळगाव शहराचा व्यापारी गाळ्यांचा भाडेकराराचा अत्यंत किचकट असा प्रश्न नगरविकास विभागाकडून लवकरच मार्गी लावून सर्व व्यापारी व उद्योजकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला हा विषय सर्वांना अनुकूल राहील. या पध्दतीने सोडवला जाणार असल्याची खात्री आहे. २०१२ ला शहरातील विविवध व्यापारी संकुलांच्या गाळ्यांची मुदत संपली असली तरी या सर्व गाळेधारकांना नवीन कराराने व्यापार व्यवसायाच्या जागा २०१९ मध्ये शासनाने लागू केलेल्या नवीन शासन निर्णयाप्रमाणे मिळवून देण्यासाठी मंत्रालय स्तरावर नगरविकास विभागाच्या अ्वर सचिव यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरू अाहे. दरम्यान आपल्या चर्चेतून आ. भोळे यांनी सुशिक्षीत, उद्योजक – व्यापारी व ग्रामीण भागाच्या मानाने एक वेगळा विचार करणारा शहराचा मतदार असल्याने मी माझ्या शहरासाठी कोणत्याही प्रकारचा विवाद उभा न करणारा, युनियनबाजी किंवा वर्गणी जमा करणारा व्यक्ती नसल्याने एकूणच निरूपद्रवी म्हणून मला समाजातून जो प्रतिसाद मिळत आहे याचे सुध्दा समाधान असल्याचे स्पष्ट केले.
जळगाव जिल्ह्याला विकासासाठी प्रचंड वाव
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्हा केळी, कापूस व सोन्याच्या व्यापाराचे एक मोठे हब असतांना जिल्ह्याची इतर बाबतीतही उत्पादन क्षमता प्रचंड असल्याने जिल्ह्याला विकासासाठी प्रचंड वाव असल्याचा अनुभव मला दिसून आला. राजकीय नेत्यांनी आपले कसब पणाला लावून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी दूरदृष्टी व नियोजनाने चालवलेले काम भविष्यात एक चांगले चित्र उभे करण्यास मदतगार ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान पुणे मुंबईच्या धर्तीवर जळगाव येथे सुध्दा आयटी सेक्टर डिक्लेअर होण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असून यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई करण्याची हमी दिली. यावेळी स्पेक्ट्रम प्रा.लि.चे दिपक चौधरी, षड्ज चौधरी हे सुध्दा उपस्थित होते.
विविध दौऱ्यांच्या यशस्वीतेमागील कर्णधार
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा लाडकी बहिण योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लखपती दीदी योजना, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा महाराष्ट्र समजून घेण्याचा जिल्हा दौरा अनुसूचित जाती आयोगाचे केंद्रीय अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांचा आढावा दौरा व आजच झालेल्या राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. के.के. तातेड असे लागोपाठ झालेले दौरे व जिल्हा वासियांसाठी शासनाच्या योजनांची उपलब्धी ठरलेले इव्हेंट या सर्वांच्या यशस्वीतेमागे कर्णधार म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची अतिशय झपाटल्यागत काम करणारा अधिकारी म्हणून जिल्ह्याला ओळख झाली.
फोटो कॅप्शन : दैनिक ‘साईमत’च्या मुख्य कार्यालयात श्री गणेश आरती करतांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. इंद्रायणी मिश्रा समवेत आ. राजूमामा भोळे.