आढावा बैठकीत रा.काँ.चा उमेदवार विजयी करण्याचा सर्वांनी केला निर्धार
साईमत।चोपडा।प्रतिनिधी।
चोपडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चोपडा विधानसभा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा पक्ष निरीक्षक भास्करराव काळे होते. बैठकीत माजी आमदार जगदीश वळवी, डी.बी.पाटील, ज्योती पावरा, डॉ. चंद्रकांत बारेला, रुस्तम तडवी अशा इच्छुक पाच उमेदवारांनी विधानसभेबाबत मनोगत व्यक्त करतांना सर्व राष्ट्रवादी पक्षाचे स्थानिक ज्येष्ठ, श्रेष्ठ नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकत्रित, प्रामाणिकपणे मेहनत घेऊन प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असा निर्धार व्यक्त केला.
यांची होती उपस्थिती
बैठकीला चोपडा विधानसभा मतदार संघातील प्रमुख ज्येष्ठ नेते माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी आमदार कैलास पाटील, घनश्याम पाटील, चंद्रहास गुजराथी, छन्नू (गोरख) पाटील, इंदिरा पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी प्रमुख पदाधिकारी, तालुका कार्यकारिणी प्रमुख पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.