गौण खनिजाच्या जप्त केलेल्या गाड्यांनी केली रस्त्यांची कोंडी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या महत्वाचे प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गौण खनिजाच्या जप्त केलेल्या गाड्यांनी रस्त्याची कोंडी केली आहे. या रस्त्यावरून मोटार सायकल जाण्यासही कसरत करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. महसूल प्रशासनाच्या आडमुठे धोरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष देवून उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील महत्वाच्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या प्रशासकीय इमारत आहे. प्रशासकीय इमारतीत जिल्हा माहिती कार्यालय, वन विभाग, महिला बाल कल्याण, जिल्हा उपनिबंधक, कृषी विभाग आदी महत्वाची कार्यालये आहेत. तसेच परिसरात जिल्हा ग्राहक न्यायालय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आहे. अशा महत्वाच्या कार्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यावर गौण खनिजाच्या जप्त केलेल्या गाड्यांनी रस्त्याची कोंडी केली आहे. त्यामुळे कार्यालाकडे जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देवून उपाय योजना करून हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी सूज्ञ नागरिकांमधून होत आहे.