विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे ठरतो महाविद्यालयाचा दर्जा

0
2

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असतो. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालयाचा दर्जा ठरत असल्याचे प्रतिपादन जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ. एस.टी. इंगळे यांनी केले. भुसावळ येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक होते. व्यासपीठावर सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, ज्येष्ठ संचालक प्रभाकर पाटील, निळकंठ भारंबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, डॉ. ए.डी. गोस्वामी, समिती प्रमुख डॉ. एस.टी. धूम, अधिसभा सदस्य प्रा. एकनाथ नेहेते, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय.एम.पाटील, पर्यवेक्षक प्रा. स्वाती पाटील उपस्थित होते.

यावेळी एस.टी. इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या एनएसएस, एनसीसी, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम आदी महत्त्वाचे असतात, अशी माहिती दिली. तसेच विद्यापीठामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘कमवा व शिका’ योजनेवर भाष्य करून विद्यापीठामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांवर प्रकाश टाकला.

यावेळी डॉ.मोहन फालक यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करुन बक्षीसांपेक्षा कौतुकाची थाप महत्त्वाची असते, असे मत व्यक्त केले. त्यानंतर कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील तसेच एनएसएस, एनसीसी, क्रीडा, कला, सांस्कृतिक आदी विभागांमध्ये विशेष पारितोषिके प्राप्त केली. अशा ८५ विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकेतून गौरविण्यात आले. बक्षीस वितरणाचे वाचन प्रा. डॉ. ममताबेन पाटील आणि प्रा. डी. एन.पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी समिती सदस्यांबरोबरच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here