शेतकऱ्यांनी विविध विषयांवर हितगुज करत मांडल्या अनेक तक्रारी
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची नुकतीच अजिंठा विश्रामगृहावर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी भेट घेत विविध विषयांवर हितगुज साधत अनेक तक्रारीही मांडल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच अडचणींना त्यांनी सविस्तरपणे समजून घेत त्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष एस. बी. पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
राज्यपालांशी हितगुज करताना जळगाव जिल्हा हा स्वादिष्ट व दर्जेदार केळीसाठी जगभरात सुप्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांपासून सातत्याने वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी, कापूस उत्पादक शेतकरी हा पूर्णता हतबल झालेला आहे. केळी, कापूस उत्पादकांना पिक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष आहे. त्याचबरोबर बऱ्हाणपूर कृषी मंडईत केळी उत्पादकांची होणाऱ्या आर्थिक लूट यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
अनेक मागण्यांबाबत राज्यपालांशी साधला संवाद
केळीला फळाचा दर्जा देऊन केळी महामंडळाची स्थापना करण्यात यावी, त्यासह यंदाच्या पावसाळ्यात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे जवळपास सर्वच पिकांवर त्याचा दुष्परिणाम झाला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, संपूर्ण कर्जमाफी करावी, रासायनिक खतावरील लिंकिंग बंद करण्यात यावी, वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे होणाऱ्या नुकसान रोखण्यासाठी शंभर टक्के अनुदानित तत्त्वावर शेतीला मजबूत कंपाउंड देण्यात यावे, जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत केळी खरेदी करण्यात यावी, रासायनिक खते तसेच शेतीला लागणाऱ्या उपयोगी वस्तू वरील जीएसटी बंद करण्यात यावा, यासह अनेक मागण्यांबाबत राज्यपालांशी संवाद साधला.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्ह्यातील शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष एस.बी.पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, भागवत महाजन, मेहमूद बागवान, डी.जी.महाजन, बारेला यांच्यासह प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.