दहिगावात चुकीचा निर्णय घेणाऱ्या पी.आय. माणगावकर यांच्या पथकाला धक्काबुक्की

0
2

साईमत, यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील दहिगाव येथे बुधवारी, ७ रोजी रात्री मिरवणूक निघाली होती. मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर कुंभारवाड्यातील काही जणांनी मिरवणुकीतील सहभागी तरुणाने महापुरुषांच्या पोस्टरची विटंबना केल्याचा आरोप केल्यामुळे दोन गटात मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी रात्री सहा संशयितांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर गुरुवारी सकाळी एका गटातील महिला व पुरुषांनी पोलीस ठाण्यात जाऊन आपले म्हणणे मांडले तर दुसऱ्या गटाने देगाव पोलीस चौकीसमोर उपोषण सुरू करून वाहनांचे टायर पेटवून गावबंदची घोषणा दिली. याप्रकरणी ८ रोजी रात्री उशिरापर्यंत एका गटाकडून सहा तर पोलिसांकडून ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दहिगाव येथील मुख्य चौकात रस्ता अडवून बसलेल्या नागरिकांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या यावल पोलीस पथकाला जमावाने धक्काबुक्की केली. त्यामुळे याप्रकरणी यावल पोलिसांनी ४० जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दहिगाव येथे बुधवारी काढलेली मिरवणूक कुंभारवाडा भागातून पुढे गेल्यावर समारोप झाला. दरम्यान, कुंभारवाडा भागात महापुरुषांच्या पोस्टरची विटंबना केल्याचा आरोप मिरवणुकीतील काही कार्यकर्त्यांवर करण्यात आला. त्यावरून दोन गटात वाद झाला होता. ही माहिती मिळताच रात्री अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपुरच्या डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर हे पथकासह गावात दाखल झाले होते. त्यांनी दोन्ही गटात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. रात्री २ वाजेपर्यंत गावात बंदोबस्त होता. तसेच खबरदारी म्हणून पोस्टरच्या विटंबनाच्या संशयावरून सहा संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेत मात्र ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या एकतर्फी कारवाईबाबत तीव्र संताप व्यक्त केला. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढून शांतता प्रस्थापित केली. खबरदारी म्हणून पोस्टरच्या विटंबनेच्या संशयावरून सहा संशयितांना ताब्यात घेतली. यानंतर गुरुवारी, ८ रोजी सकाळी एका गटातील महिला, पुरुषांनी पोलीस ठाणे गाठून निष्पाप तरुणांना ताब्यात घेतल्याचा आरोप करून तीव्र संताप व्यक्त केला.

उपोषण मागे घेऊन रस्ता केला मोकळा

दहिगावातील सीसीटीव्ही फुटेज पाहून, तपासून जो कोणी दोषी असेल त्यांना अटक करा, अशी मागणी केली. दुसरीकडे दुसऱ्या गटाने दहिगावात चौकात टायर जाळून गावबंदची संतापजनक घोषणा केली. शेकडो महिलांनी उपोषण करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दुपारी चार वाजता पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर उपोषण मागे घेऊन रस्ता मोकळा केला. याप्रकरणी एका गटाकडून सहा जणांना ताब्यात घेतले तर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून ४० जणांविरुद्ध यावल पोलिसांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे दाखल केले आहे.

४८ तासाची संचारबंदी

दहिगावातील तणावाची आणि स्फोटक परिस्थिती लक्षात घेता प्रभावी प्रांताधिकारी अर्पित चव्हाण यांनी गुरुवारी, ८ रोजी सायंकाळी ७:३० वाजेपासून पुढील ४८ तासासाठी गावात संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढले. संचारबंदीच्या काळात राज्य राखीव पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकारी दहिगावात तळ ठोकून

यावलचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना दहिगावातील परिस्थिती हाताळता न आल्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अन्नपूर्णासिंग भुसावळ डीवायएसपी, एलसीबीचे नजनकुमार पाटील, प्रभारी प्रांताधिकारी अर्पित चव्हाण, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, रावेरचे तहसीलदार बंडू कापसे, यावल, जळगाव, फैजपूर, चोपडा, अडावद याठिकाणच्या पोलीस पथकाचा दहिगावात कडक पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी दहिगावात तळ ठोकून असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

यावल तालुक्यातील दहिगावातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच यापूर्वी नगर जिल्ह्यात वादग्रस्त ठरून निलंबित झाल्यानंतर यावल पोलीस स्टेशनला बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उशिरा का होईना परंतु चांगला निर्णय घेतल्याने यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पोलीस दलाविषयी सकारात्मकरित्या चर्चिले जात आहे.त्यांच्या जागी प्रभारीपदी रावेरचे स.पो.नि. हरीष भोये यांची नियुक्ती केली आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या अंगावर बांगड्या फेकून त्यांच्या चुकीच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करून त्यांना संतापजनक निरोप दिल्याचे यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात चर्चिले जात आहे. या घटनेमुळे तालुक्यातील पोलीस दलात एका अधिकाऱ्याच्या अंगावर बांगड्या फेकून निषेध केल्याची ही यावल तालुक्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे. त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

दहिगावात दोन समुदायांमध्ये तणाव

यावल तालुक्यातील दहिगाव येथे बुधवारी रात्री दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. तेव्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या चुकीच्या नियोजनामुळे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली. गुरुवारी, ८ रोजी दिवसभर गावात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा फैजपूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्पित चव्हाण यांनी दहिगावात ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेपासून ४८ तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. यासंदर्भातील निर्देश लागू केले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत कुणालाही घराबाहेर पडता येणार नसून अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठानेही बंद राहणार आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ (१) अन्वये संचारबंदी लागू केली आहे.

पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर कंट्रोल रूमला जमा

दंगलीच्या विषयाला घेवून यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यांच्या जागी रावेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांची प्रभारीपदी नियुक्त केली असल्याची माहिती विश्‍वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here