शिवसेना कुणाची याचे पुरावे काय मागता? हजारो शिवसैनिकांनी मराठी अस्मितेसाठी आणि हिंदुत्वासाठी बलिदान दिलेले आहे, यापेक्षा आणखी कोणता मोठा पुरावा हवा, अशा शब्दांत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी शिंदेगटावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विनायक राऊतांनी तीन वेळा पत्र दिलं, त्याला उत्तर दिलं नाही
राऊत म्हणाले की, खरी शिवसेना कुणाची यासाठी पुरावा काय मागता? पुरावा काय पाहिजे, सीमाप्रश्नासाठी शहीद झालेले आमचे शिवसैनिक हा पुरावा आहे. या मराठी माणसाच्या मनामनात, कणाकणात शिवसेना आहे, हा पुरावा आहे. 10-20 आमदार फोडले हा काही पुरावा होऊ शकत नाही. शिवसेनेचे लोकसभेतील आमचे गटनेते विनायक राऊत यांनी तीन वेळा पत्र देऊनही लोकसभा अध्यक्षांनी पत्र दिले नाही, पण हा गट जातो तेव्हा त्यांना उत्तर दिले जाते.
राऊत पुढे म्हणाले की, ज्यांनी दिल्लीच्या आदेशावरून, महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या आदेशाने ही वेळ आणली आहे, हे सर्व बाळासाहेबांचा आत्मा वरून पाहतो आहे, त्यांना माफ करणार नाही. लोकं यांची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत, मार्क माय वर्ड्स! असंही राऊत म्हणाले.
ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना
ते म्हणाले की, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, 56 वर्षांची ही शिवसेना आहे, हजारो शिवसैनिक हिंदुत्वासाठी शहीद झाले आणि आम्हाला पुरावे मागता? आमचे हजारो शिवसैनिक मराठी अस्मिता- हिंदुत्वासाठी शहीद झाले यापेक्षा आणखी कोणता पुरावा पाहिजे. अजूनही सरकारचं अस्तित्व दिसत नाही, हे सर्व निर्णय बेकायदेशीर आहेत, हे लवकरच कळेल, असेही ते म्हणाले.
‘उठाव’मधील उ-ठ म्हणजे उद्धव ठाकरे’
आमचं बंड नसून उठाव असल्याचं बंडखोर म्हणत असल्याच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, त्यांचा उठाव असेल तर त्यातील उ-ठ म्हणजे उद्धव ठाकरे आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही राऊतांनी टीका केली. लवकरच उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणार असून ती सामनात प्रसिद्ध होईल, सर्व माध्यमांना त्याची प्रत दिली जाईल अशी माहिती राऊतांनी दिली. जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत, त्यांना उत्तरे दिली जातील, असेही ते म्हणाले.