वृद्धेची चोरलेली मंगलपोत पोलिसांनी केली अखेर परत

0
24

साईमत, एरंडोल : प्रतिनिधी

सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या वृद्धेची मंगलपोत तोडून तिघे आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी अवघ्या चार दिवसात दोघांना अटक करून त्यांच्याकडून मंगल पोत जप्त करून ती वृध्देला परत केली आहे. याबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे एरंडोल शहरातून कौतुक होत आहे.

सविस्तर असे की, पत्रकार विश्वास चौधरी यांच्या काकू विमलबाई लक्ष्मण चौधरी (रा. चौधरी वाडा, एरंडोल) या २४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विश्रामगृह रस्त्यावरून फिरण्यास जात होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने धरणगाव रस्ता कुठे आहे, अशी विचारणा करून त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाची मंगल पोत तोडून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. विमलबाई यांच्या हे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत आपली पोत धरून ठेवली. चोरट्याने त्या पोतला हिस्का मारून त्यातील ७२ हजार रुपये किंमतीची १८ ग्रॅम वजनाची अर्धी पोत तोडून फरार झाला होता. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांच्याकडे या घटनेचा तपास देण्यात आला होता. सपोनि गणेश अहिरे यांनी घटनास्थळावर सापडलेल्या मोबाईलवरून या आरोपींच्या अवघ्या चार दिवसात छडा लावला. आरोपी हे चाळीसगाव येथे येत असल्याची गुप्त माहिती गणेश अहिरे यांच्या पथकाला मिळाली होती. पथकाने सापळा रचून आरोपी सय्यद तोसीब सय्यद आणि राजू खरे (दोन्ही रा. जळगाव) या दोघांना सिनेस्टाईल ताब्यात घेतले.

दोघांनी मंगलपोत चोरल्याची कबूली देऊन आपल्या जवळील १८ ग्रॅम वजनाची मंगल पोत ही पोलिसांना काढून दिली. पोलिसांनी ती जप्त करून न्यायालयाच्या आदेशावर १८ सप्टेंबर रोजी वृद्ध महिला विमलबाई लक्ष्मण चौधरी यांना सुपूर्द केली. चोरलेली मंगल पोत परत मिळाल्याने वृध्देच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांनी चार-पाच दिवसात मुद्देमालासह आरोपींना अटक करून मंगल पोत वृध्देला परत केल्यामुळे एरंडोल शहरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here