साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय जैस्वाल यांनी २०२१-२२ दिव्यांग कल्याण निधी ५ टक्के मध्ये अनियमितता करीत घोळ केल्याच्या कारणावरून नाशिक विभागीय आयुक्त यांनी ठपका ठेवत त्यांना ६ फेब्रुवारीपासून अपात्र ठरविले आहे. नाशिक आयुक्तांच्या दणक्याने लोहाऱ्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान, अक्षय जैस्वाल यांनी सदस्यांसह ३० जानेवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांनी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी प्रवेश घेतल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचा भाजपात प्रवेश ७ दिवसांपूर्वी होऊनही कारवाई झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. जैस्वाल यांना अपात्र ठरविल्यानंतर दिव्यांग एकता संघटनेने फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.
दिव्यांग एकता बहुउद्देशीय संस्थेचे विकास शिवदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील व सदस्यांनी ग्रामपंचायत लोहारा यांच्याकडे दिव्यांग कल्याण निधी पाच टक्के हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून देण्यात यावा, अशी मागणी केली होती. तसे वारंवार स्मरणपत्रही दिलेले होते. मात्र, सरपंच जैस्वाल यांनी दिव्यांगांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत जाणून बुजून दिव्यांगांना बँक खात्यात निधी न देता पंख्यांची खरेदी केली होती. पंख्यांच्या खरेदीत शासकीय आर्थिक सूत्रांचे पालन न केल्याने व अनियमितता करत घोळ केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यावरून सरपंच जैस्वाल यांची विभागीय आयुक्त नाशिक यांनी जळगाव जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत संपूर्ण चौकशी केली. दप्तराची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर सरपंच जैस्वाल यांनी लाभार्थ्यांची मागणी नसताना ७० लाभार्थ्यांच्या इतके पंखे १ लाख ६० हजार ३०० रुपयांचे खरेदी केले. फक्त २५ पंखे वाटप करत ४५ पंखे ग्रामपंचायतमध्ये साठा रजिस्टरमध्ये शिल्लक आहेत, यावरून दिव्यांग कल्याण निधी खर्च करताना वित्तीय औचित्याचे पालन न झाल्याने निधीचा अपव्यय झाला आहे, असा ठपका ठेवला आहे. त्यावरून सरपंच हे ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार अपात्र असल्याचा निकाल ६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिला.
दिव्यांग एकता बहुउद्देशीय संस्थेच्या सभासदांनी दिव्यांग कल्याण निधी पाच टक्के हा बँक खात्यातून ग्रामपंचायतीने द्यावा, अशी मागणी केलेली असताना सरपंच अक्षय जैस्वाल यांनी मनमानी पद्धतीने दिव्यांग यांची मागणी पायदळी तुडवत शासकीय नियमांचे पालन न करता जाणून बुजून कमी किमतीचे चायनामेड पंखे खरेदी करून जास्त किमतीचे दाखविले. त्यातही अनियमितता करत अपहार केला असल्याची तक्रार केली. नाशिक विभागीय आयुक्त यांनी न्याय देत मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या सरपंचाला घरी पाठविले. ‘सत्य परेशान होता है पराजित नही’, अशी प्रतिक्रिया दिव्यांग एकता बहुउद्देशीय संस्थेचे विकास शिवदे यांनी दिली आहे.
शासनाच्या प्रत्येक योजनांमध्ये भ्रष्टाचार करून खुर्चीची हाव असणाऱ्या सरपंच जैस्वाल यांनी दिव्यांगांच्या एक लाख साठ हजार तीनशे रुपयांचा निधीचा भ्रष्टाचार करणे, ह्या निंदनीय प्रकाराचा निषेध व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया लोहारा ग्रामपंचायतीचे सदस्य कैलास चौधरी यांनी दिली आहे.