साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
कोळी समाज बांधवांच्या समस्यांबाबत अतिशय संवेदनशीलपणे लवकरच मार्ग काढणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आश्वासन दिले. तसेच जळगावला सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्या अनुषंगाने कोळी समाज बांधवांनी उत्साहाच्या भावनेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यवाहीचे स्वागत करत सर्व मान्यवरांना धन्यवाद दिले.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत कोळी समाज बांधवांच्या विविध मागण्यांसाठी बैठकीचे आयोजन केले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव येथे कोळी समाज बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणस्थळी भेट देऊन ना. गिरीश महाजन यांच्या माध्यमातून लवकरच बैठकीचे आयोजन करू, अशी भावना व्यक्त करत प्रयत्न करण्याचे कोळी समाज बांधवांशी चर्चेअंती ठरविले होते. त्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहावरील आयोजित बैठकीला ना.गिरीश महाजन, ना. विजयकुमार गावित, ना. अनिल पाटील, कोळी महासंघाचे अध्यक्ष आ.रमेश पाटील, आ. राजू मामा भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी तसेच आजी-माजी मंत्री, माजी आमदार, कोळी समाज बांधव, संघटनांचे पदाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे सचिव, संबंधित अधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव उपस्थित होते.