एम.एम. महाविद्यालयात गुणगौरव, अंकुर प्रकाशन, विविध विभागांचे उद्घाटन
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी आमदार दिलीप वाघ यांनी अध्यक्षीय मनोगतात दिली. येथील पीटीसी संस्थेच्या एम.एम. महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, अंकुर नियतकालिकाचे प्रकाशन, विविध विभागांचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. सरस्वती पूजनासह दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रम सुरू झाला. उपस्थितांच्या हस्ते स्वतंत्र आणि अद्ययावत आयसीटी आणि कॅम्प विभागाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रांताधिकारी भूषण अहिरे, डॉ.मुकुंद करंबळेकर (चाळीसगाव), संमोहन तज्ज्ञ तथा अभिनेते शैलेंद्र गायकवाड, कजागिस्तान आर्यन मॅन पुरस्कार प्राप्त रजनीश गायकवाड, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, विद्यापीठ सिनेट सदस्य व्ही.टी.जोशी, प्रा.सुभाष तोतला, दुष्यंत रावल, खलील देशमुख, दगाजी वाघ, डॉ.जयंत पाटील, आकाश वाघ, प्राचार्य शिरीष पाटील, एन.एन.गायकवाड, डॉ. वासुदेव वले, ऋषिकेश ठाकूर, नितीन पाटील यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
गुणवंत २०० विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींचा गौरव
कार्यक्रमात अकरावी ते एम. ए. पर्यंतच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण आणि विविध परीक्षेत नैपुण्य मिळविलेल्या २०० विद्यार्थी व विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्राच्यावतीने डॉक्टरेट मिळविणाऱ्या डॉ. योगेश पुरी, कजागिस्तान आर्यन मॅन पुरस्कार प्राप्त रजनीश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय डॉ.वासुदेव वले यांनी करुन दिला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शिरीष पाटील तर सूत्रसंचालन तथा आभार डॉ.माणिक पाटील यांनी मानले.