उष्णतेच्या झळांमध्ये दिलासा; मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज
साईमत / नवी दिल्ली
राज्यात सध्या हवामानाने दुहेरी स्वरूप धारण केले आहे. एकीकडे कडक उन्हाचा तडाखा जाणवत असून दुसरीकडे काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना अस्थिर हवामानाचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित झाले असून दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. पुढील महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, उष्णतेच्या झळांमध्ये थोडासा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट या संस्थेने यंदा मान्सून भारतात लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दक्षिण भारतात पोहोचण्याची शक्यता आहे.
मान्सूनचे नैऋत्य वारे सर्वप्रथम अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होतात. त्यानंतर ते केरळमध्ये प्रवेश करतात. यंदा अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून १८ ते २५ मे दरम्यान दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर २५ मे ते १ जून या कालावधीत मान्सून देशाच्या इतर भागांकडे सरकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह उत्तर आणि पूर्व भारतात तापमानाने ४३ ते ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला असून अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. पुढील काही दिवसांतही तापमान वाढीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
