एलसीबीने ४ दिवसात लावला छडा ; तीन गावठी पिस्तुल, मोबाईलसह रोकड जप्त
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भुसावळसह मुक्ताईनगर तालुक्यातील तीन पेट्रोल पंपांवर झालेल्या सशस्त्र दरोड्यांच्या मालिकेचा अखेर उलगडा करण्यात आला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) तब्बल चार दिवसांच्या अथक तपासानंतर या प्रकरणातील सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्यांमध्ये अकोला येथील कुख्यात गुन्हेगाराचाही समावेश आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर गेल्या ९ ऑक्टोबर रोजी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. त्यानंतर टोळीने मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाटा येथील ‘मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप’ तसेच वरणगाव शिवारातील तळवेल फाटा येथील ‘सैय्यद पेट्रोल पंपावर’ लूट केली. सीसीटीव्ही फोडून डीव्हीआर घेऊन गेलेल्या दरोडेखोरांनी १ लाख ३३ हजार रुपयांची लूट केली होती.
पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे आरोपींचा माग काढला. कारवाईत एलसीबी पथकाने नाशिक व अकोला येथून पाच आरोपींना अटक केली तर एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले आहे. अटकेतील आरोपींमध्ये सचिन अरविंद भालेराव (वय ३५, भुसावळ, ह.मु. खकनार, जि.बऱ्हाणपूर, म.प्र.), पंकज मोहन गायकवाड (३०, वेडीमाता मंदिर, जुना सातारा रोड, भुसावळ), हर्षल अनिल बावस्कर (२१, बाळापूर, अकोला), देवेंद्र अनिल बावस्कर (२३, बाळापूर, अकोला), प्रदुम्न दिनेश विरघट (१९, श्रद्धानगर, कौलखेड, अकोला) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ४० हजारांची रोकड, तीन गावठी पिस्तुल, पाच मॅग्झीन, नऊ मोबाईल फोन आणि एक सॅक बॅग जप्त केली आहे.
यांनी केली कारवाई
अटकेतील प्रमुख आरोपी सचिन भालेराव याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात खुनाचा प्रयत्न आणि दंगा अशा दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपीस २०२४ मध्ये दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली केली. पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे आणि ग्रेडेड पीएसआय रवी नरवाडे यांचा समावेश होता. अटकेतील आरोपींना पुढील तपासासाठी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.