साईमत, लोहारा, ता. पाचोरा : वार्ताहर
येथील ग्रामपंचायतीच्यासमोर घाणीचे साम्राज्य पसरल्याचे पहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या बाजुलाच हजारो भक्तांचे श्रद्धास्थान श्रीरामाचे मंदिर आहे. तसेच सरकारी दवाखाना, वाचनालय, अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक संघ केंद्र, कन्या शाळा आहे. मात्र, घाणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. नालेसफाई वेळेवर होत नसल्यामुळे मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी येत आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार नागरिकांच्या सुरक्षितेसाठी स्वच्छ भारत मिशन मोहीम राबवित आहे. मात्र, ग्रामीण भागाकडे स्वच्छ भारत मिशन मोहीम केवळ नावापुरतेच राहिलेली आहे, अशी समज नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.
यापूर्वी श्रीराम मंदिर रामप्रतिष्ठेवेळी संपूर्ण परिसर गावातील तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी स्वच्छ केला होता. परंतु त्या परिसरातील रहिवाशी पुन्हा श्रीराम मंदिर व ग्रामपंचायतीच्या मधोमध गावातील घाण, उकिरडा आणून टाकला जात आहे. घाणीमुळे मंदिराचे पावित्र्य जपले जात आहे का? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. वाचनालय, अभ्यासिकासमोर गटारी तुडुंब भरलेल्या असतात. वाचनालयातील वाचकांसह विद्यार्थ्यांना रोजच दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे केंद्र दर रविवारी भरत असल्याने त्याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना गटार ओलांडून जात असताना मोठी कसरत करावी लागते. कधी-कधी त्यांचा तोल जाण्याची शक्यता असते. त्यातून मोठा अपघातही होऊ शकतो हे नाकारता येणार नाही.
अस्वच्छतेमुळे डासांच्या उत्पत्तीत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे डेंग्यू, साथीचे आजार यासारखा अनेक रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागरी सुविधांअभावी ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. लोहारा ग्रामपंचायत यांनी नागरिकांच्या जीवांशी न खेळता गावातील, सांडपाणी, नालाची (गटारी) सफाई व मुख्य रस्त्यावरील खते यांची गावाबाहेर विल्हेवाट लावावी, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.