Maharishi Valmiki ; महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले

0
5

कोळी समाजाच्या परंपरागत शिस्तबद्ध आयोजनात युवक, महिला आणि लहान मुले सहभागी

साईमत/फैजपूर/प्रतिनिधी :  

शहरातील आठवडे बाजार श्रीरामपेठ परिसरातील वाल्मिक नगरमध्ये रामायणाचे रचयिता, आद्यकवी महर्षी वाल्मिक यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दि.१२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उत्साह, श्रद्धा आणि भक्तीमय वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली. आ.अमोल जावळे यांच्याहस्ते महर्षी वाल्मिक यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास विविध मान्यवर, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते.

वाल्मिक नगरात संध्याकाळी वाल्मिक मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सुवासिक फुलांच्या माळांनी आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. सजवलेल्या ट्रॅक्टरवर महर्षी वाल्मिक यांची भव्य मूर्ती विराजमान करून मूर्ती पूजनानंतर आरती करण्यात आली. भाविकांच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला. भक्तिगीतांच्या गजरात शहर दुमदुमून गेले होते.

कार्यक्रमाला महामंडलेश्वर पवनदास महाराज, सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, प्रभाकर सोनवणे, माजी नगरसेवक प्रभाकर सपकाळे, सिद्धेश्वर वाघुळदे, जयश्री चौधरी, भाजपा शहराध्यक्ष पिंटू तेली, अनंत नेहेते, पप्पू चौधरी, हेमराज चौधरी, नितीन राणे, भारती पाटील, वसंत परदेशी, प्रकाश कोळी, लता मेढे, नितीन नेमाडे, निलेश चौधरी, केतन किरंगे, गणेश गुरव यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी आ.अमोल जावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महर्षी वाल्मिक हे आदर्श जीवनमूल्यांचे प्रतीक आहेत. त्यांनी रामायणाच्या माध्यमातून जगाला सत्य, कर्तव्य, निष्ठा आणि आदर्शाचे मूल्य शिकवले. रावेर-यावल तालुक्यातील कोळी समाज दरवर्षी वाल्मिक जयंती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करून एक प्रेरणादायी परंपरा जोपासत आहे. प्रत्येक युवक-युवती आणि नागरिकाने आयुष्यात एकदा तरी रामायणाचे वाचन करून प्रभू श्रीरामांचा आदर्श अंगीकारावा. नव्या पिढीतील युवकांनी पालकांचा सन्मान करीत समाजात एकतेचा संदेश द्यावा, असे आवाहन केले.

मिरवणूक कोळीवाडा, आठवडे बाजार, खुशालभाऊ रोड, विठ्ठल मंदिर, वॉर्ड रथ गल्ली, लक्कडपेठ मार्गे मोठा मारुती मंदिर येथे पोहोचली. येथे मोठ्या मारुतीला पुष्पहार अर्पण करून सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. भाविकांच्या सहभागाने संपूर्ण परिसर ‘जय श्रीराम, महर्षी वाल्मिक महाराज की जय’ च्या घोषणांनी दुमदुमून गेला. कार्याध्यक्ष दिलीप कोळी यांच्या हस्ते हनुमान आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी कार्याध्यक्ष दिलीप कोळी, संतोष कोळी, सागर कोळी, विजय कोळी, मोहन कोळी, रुपेश कोळी, निखील कोळी, दीपक कोळी, विशाल कोळी, चंदू कोळी यांच्यासह वाल्मिक समाज बांधवांनी परिश्रम घेतले. मिरवणुकीदरम्यान कोळी समाजातील महिला, तरुणाई, लहान मुले तसेच शहरातील नागरिकांनी उत्साहात सहभाग नोंदवला. अखंड भक्तीगीतांच्या गजरात आणि शांततेत मिरवणूक पार पडली. महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त फैजपूर शहर भक्ती, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेच्या उत्सवाने न्हाऊन निघाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here