प्रहारचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी केली पाहणी
साईमत/ न्यूज नेटवर्क/ फैजपूर :
शहरातील मिल्लत नगर परिसर नव्याने वाढणारा भाग आहे. त्याठिकाणी सोयीसुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी नुकतीच भेट दिली. चिखलातून वाट तुडवित त्यांनी संपूर्ण भागात पाहणी केली. तसेच लागलीच नगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. फैजपूर नगरपालिकेतर्फे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर पाऊले न उचलल्यास आगामी काळात आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असे अनिल चौधरी यांनी सांगितले.
फैजपूर शहरातील मिल्लत नगर परिसरात नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिसरात जाण्यासाठी रस्ते नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, विद्युत व्यवस्था नाही. नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी परिसरात भेट दिली. चिखलातून वाट तुडवीत संपूर्ण परिसरात त्यांनी पाहणी केल्यावर जागोजागी पाण्याचे तळे साचलेले होते. मच्छरांमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. रस्त्याने चालताना पाय घसरून, दुचाकी घसरून अपघात होत आहे.
परिसरात किमान मुरूम टाकावा
अनिल चौधरी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत लागलीच फैजपूर नगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पावसाळ्याचे दिवस असल्याने किमान परिसरात मुरूम टाकण्याचे त्यांनी सांगितले. मिल्लत नगर नव्याने वाढणारा परिसर असून नागरिकांना मशिदीत जाण्यासाठी रस्ता नसल्याचेही सांगण्यात आले.