लोहाऱ्यात माझे सरकार केंद्र, लाडकी बहिण योजना, नेत्र तपासणी शिबिराप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन
साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी :
महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि समाजातील प्रत्येक घटकांसाठी केंद्र आणि महायुती सरकार सर्वांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. तसेच केंद्र आणि राज्य सरकार यांच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसेही लवकरच खात्यावर येतील, असेही त्यांनी सांगितले. लोहारा येथे रविवारी, ११ ऑगस्ट रोजी लोहारा येथील मराठी मुलांची शाळेच्या पटांगणावर भव्य सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. त्यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्यात आले. त्यानंतर लोहारा विविध कार्यकारी सोसायटी यांनी नवीन सुरू केलेले ‘माझे सरकार केंद्रा’चे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजनही केले होते. यावेळी लोहारा-कुऱ्हाड गटात केलेल्या विविध कामांची माहिती ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांनी दिली.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, संजय गरुड, लोहारा-कुऱ्हाड गटाचे पालक पदाधिकारी सुहास पाटील, विकासोचे चेअरमन प्रभाकर चौधरी, लोहाराचे सरपंच अक्षय जैस्वाल, उपसरपंच दीपक खरे, ज्येष्ठ कार्यकर्ते शरद सोनार, म्हसासचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, डॉ.प्रदीप महाजन, संजय पाटील, जगदीश तेली, सुनील क्षीरसागर, नंदू सुर्वे, विकास देशमुख, मच्छिंद्र माळी, जयेंद्र सूर्यवंशी, अनिल तडवी, लक्ष्मण कोळी, शरद कोळी, शांताराम कोळी, भगवान खरे, संभाजी चौधरी, सुरेश चौधरी, हसन कुरेशी, सादिक खान यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक शरद सोनार, सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील तर आभार रमेश शेळके यांनी मानले.
मंत्र्यासमोर सरपंचाबद्दल ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा
मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना ग्रामस्थांनी थेट सभा मंचावर येऊन सरपंच अक्षय जैस्वाल यांच्याबद्दल तक्रारी देण्यास सुरुवात केली. ग्रामपंचायतमध्ये वेळोवेळी जाऊनही काम होत नसल्याने एक सही घेण्यासाठी वारंवार फिरावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच विविध कामांसाठी लागणाऱ्या एनओसी मिळत नाही, महिलांसाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावे, आठवडे बाजार येथे फ्लेवर ब्लॉक बसविण्यात यावे, अभ्यासिकेसाठी मुलांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या, गावातील गटारींची स्वच्छता करण्यात यावी, अशा अनेक समस्यांचा पाढा ग्रामस्थांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर वाचला. त्यामुळे मंत्री महाजन यांनी तात्काळ गटविकास अधिकाऱ्यांंची बैठक लावण्याचे आदेश दिले. सरपंच यांनाही वेळेवर काम करण्याची तंबी दिली.