अज्ञात वाहनाच्या कटमुळे अपघात; पोलिस हवालदाराच्या कुटुंबाचा थरारक जीवित बचाव
साईमत / चाळीसगाव
चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाने अचानक कट मारल्यामुळे कार थेट सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने ही कार एका मोठ्या झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि कारमधील चारही जणांचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथून छत्रपती संभाजीनगर कडे जात असताना मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्याचे हवालदार दिनेश बारड (वय ५१) हे आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते. त्यांच्या सोबत पत्नी तेजश्री बारड (४८), मुलगी नंदिनी बारड (२२) आणि मुलगा वेदांत बारड (१८) असे चौघे जण कारमध्ये होते.
रविवारी सायंकाळी सुमारे पावणे पाच वाजेच्या सुमारास त्यांची कार घाटात पोहोचली असता, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला अचानक कट मारला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून कार दरीच्या दिशेने झेपावली.
कार वेगाने खाली जात असताना काही अंतरावर असलेल्या झाडांमध्ये अडकली. त्यामुळे वाहन पूर्णपणे दरीत कोसळण्यापासून थांबले आणि चारही प्रवाशांचा जीव वाचला. अपघाताचा आवाज ऐकताच इतर प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरीत अडकलेल्या वाहनातून जखमींना बाहेर काढणे आव्हानात्मक होते. मात्र स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अत्यंत कष्टाने दोघी महिला व दोघे पुरुष अशा सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे घाट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
