चौक-दुभाजक सुशोभीकरणासाठी महापौरांचे कडक निर्देश
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहराच्या सौंदर्यीकरणाला गती देण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला ठोस आणि कडक निर्देश दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख चौक आणि दुभाजकांचे (डिवायडर) सुशोभीकरण पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले असून, कामांमध्ये विलंब करणाऱ्या विकासकांना थेट अल्टिमेटम देण्यात आला आहे.
गुरुवारी (९ एप्रिल) महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली शहर सौंदर्यीकरणासंदर्भात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि दुभाजकांच्या डिझाईन, अंमलबजावणी आणि देखभालीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
शहर सौंदर्यीकरणात एकरूपतेवर भर
या बैठकीत महापौरांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, शहरातील प्रत्येक चौक आणि दुभाजक सुशोभित करताना त्यामध्ये एकसमानता (सिमिलॅरिटी) आणि ठराविक डिझाईन रिदम असणे आवश्यक आहे.त्या म्हणाल्या,“बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर शहराची पहिली छाप प्रभावी पडली पाहिजे. त्यामुळे चौकांचे रेखांकन, डिझाईन आकर्षक आणि एकसारखे असावे. दुभाजकांची उंची, रिफ्लेक्टर आणि झाडांची निवडही एकसमान ठेवावी.”शहरात सौंदर्यीकरण करताना वृक्षारोपणासाठीही एकाच प्रकारच्या झाडांची निवड करण्यावर भर देण्यात आला.
अतिक्रमण हटवण्याचे आदेश; वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजन
सुशोभीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी चौकांभोवतीची अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच दुभाजकांची रचना करताना ती चौकाला अगदी लागून न करता पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंगची योग्य जागा ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.वाहतूक व्यवस्थेचा विचार करून चौकांमध्ये वाहतूक सुरळीत राहील यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
कामात दिरंगाई करणाऱ्या विकासकांना ८ दिवसांची मुदत
बैठकीत विविध विकासकांनी पीपीटी व व्हिडिओ सादरीकरणाद्वारे प्रकल्पांचा आढावा सादर केला. मात्र, शिवाजीनगर ते जैन मंदिर दरम्यानच्या कामाबाबत संबंधित विकासकांकडून अपेक्षित प्रगती न झाल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली.
संबंधित विकासकांना पुढील ८ दिवसांत काम सुरू करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. अन्यथा हे काम दुसऱ्या विकासकाला देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
प्रमुख मार्गांचे होणार कायापालट
शहरातील अनेक महत्त्वाच्या मार्गांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पुढील मार्गांचा समावेश आहे:
- टॉवर चौक ते महापालिका इमारत
- शिवतीर्थ चौक ते नंदिनीबाई विद्यालय
- स्वातंत्र्य चौक ते आकाशवाणी चौक
- कावरत्नावली चौक ते माबळ स्टॉप
- डी-मार्ट ते रामानंदनगर व लांडोरखोरी उद्यान
- मेहरूण येथील स्वामी समर्थ चौक ते एकनाथ नगर
- सिंधी कॉलनी चौक ते पिंपराळा उड्डाणपूल
पुढील पाच वर्षे देखभाल बंधनकारक
खंडवा पिस ते अजिंठा चौक दरम्यानच्या कामासाठी वाहतूक शाखा व महावितरणचे सहकार्य घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हे प्रकल्प फक्त उभारणीपुरते मर्यादित न ठेवता पुढील पाच वर्षांची देखभाल (मेंटेनन्स) संबंधित संस्थांकडेच राहणार आहे.
अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
महावितरणच्या अधिकाऱ्यांना शहरातील रस्त्यांमध्ये अडथळा ठरणारे विद्युत खांब तातडीने हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वाहतूक शाखेला चौकांमध्ये होणारी बेशिस्त पार्किंग व वाहतूक नियंत्रणासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीला मान्यवरांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीस उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त पंकज गोसावी, वास्तुविशारद संदीप सिकची, ललित राणे, पर्यावरण विभाग प्रमुख प्रकाश पाटील, विद्युत विभागाचे संदीप मोरे, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, तसेच विविध विकासक संस्था, महावितरण व वाहतूक शाखेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहर सौंदर्यीकरणाच्या या व्यापक आराखड्यामुळे जळगावचे रूप येत्या काळात अधिक आधुनिक, सुटसुटीत आणि आकर्षक होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
