Baghpur Lift Irrigation Project : जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाला वेग

0
32

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जाणून घेतला आढावा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जिल्ह्यातील महत्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी सविस्तर आढावा जाणून घेतला. अशा प्रकल्पामुळे जळगाव, जामनेर, पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांचा मोठा दिलासा मिळणार आहे. भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाची एकूण किंमत ३५३३.०५ कोटी रुपये आहे. शासन निर्णय क्रमांक ९२४/प्र.क्र.४३६/२४/मो.प्र.१, ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पत्रान्वये सुधारीत प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. अशा योजनेतून जामनेर व पाचोरा तालुक्यातील ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांचे लाभक्षेत्र स्थिर केले जाणार आहे. एकूण ९८.३५ दलघमी पाणीसाठ्याचा उपयोग होणार आहे. त्याद्वारे जळगाव तालुक्यातील १३ हजार ९०४ हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळेल.

प्रकल्पाचे नियोजन दोन टप्प्यात केले आहे. टप्पा-१ अंतर्गत जळगाव तालुक्यातील चिंचोली, कंडारी, उमाळे, पाथरी, धानवड, शिरसोली प्र. बो., दापोरे, जावखेडे, देव्हारी आदी २६ गावातील १३ हजार ९०४ हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. टप्पा-२ अंतर्गत ४४.५ किलोमीटर लांबीच्या उद्धरण नलिकेद्वारे आणि १८ हजार ४६७ अश्वशक्तीच्या पंपांद्वारे ९८.३५ दलघमी पाणी उचलून जामनेर तालुक्यातील २२ लघु व २ मध्यम, पाचोरा तालुक्यातील २० लघु व ३ मध्यम तसेच जळगाव तालुक्यातील २ लघु अशा एकूण ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांमध्ये पाणी साठवले जाणार आहे. त्यामध्ये कांग प्रकल्पाची उंची वाढ, गोलटेकडी ल.पा. प्रकल्प नव्याने तसेच एकुलती सा.त. प्रकल्प नव्याने उभारण्याचाही समावेश आहे. या टप्प्यातून १६ हजार ८६० हेक्टर क्षेत्राचे स्थिरीकरण होणार आहे.

शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होणार

प्रकल्पामुळे तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे. प्रकल्पाच्या कार्यान्वयनातील अडचणींचा आढावा घेऊन काम तातडीने सुरू करण्याच्या सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या. आढावा बैठकीला सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील, अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता प्रल्हाद वराडे, उपअभियंता चंद्रशेखर खंबायत आदी अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here