साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा गावात सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकारामुळे परिसर हादरला होता. ‘त्या’ नराधमाने चिंचखेडा शिवारातील शेतात हे दुष्कृत्य करून पलायन केले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून त्याची ओळख निश्चित केली होती. त्यानंतर तो गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथकाला गुंगारा देत होता. अखेर ‘त्या’ नराधमाला गुरुवारी, २० जून रोजी भुसावळातून एलसीबीच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, नराधम आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
सुभाष इमाजी भील (वय ३५, रा. वावडदा, ह.मु. चिंचखेडा, ता. जामनेर) या नराधमाला गुरुवारी, २० जून रोजी भुसावळ येथून पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने एलसीबीच्या सूत्रांशी संपर्क साधल्यावर त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अखेर ९ दिवसांनी नराधमाला भुसावळ तालुक्यातील तापी नदीच्या परिसरातून दुग्ग्याची देवी मंदिराजवळ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) ने शिताफीने ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विशाल पाटील, कमलाकर बागुल, संजय हिवरकर, भुसावळ बाजारपेठचे कर्मचारी उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, रमण सुरळकर, भुसावळ शहरचे राहुल भोई यांनी केली आहे.