पुणेः
तीन वर्षाच्या मुलीने शाळेतून घरी आल्यानंतर शिक्षिकेविरोधात वडिलांकडे तक्रार केली. मुलीची तक्रार ऐकून बापाच्या पायाखालची जमिनच हादरली. त्याने लगेचच पोलिस ठाण्यात धाव घेत शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केला आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली आहे.
टीचर शाळेत केस ओढतात…
टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात, अशी तक्रार तीन वर्षांच्या मुलीने तिच्या वडिलांकडे केली. मुलीने केलेल्या या तक्रारीनंतर वडिलांनीही थेट पोलीस स्टेशन गाठले आणि संबंधित शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. कोथरूड पोलीस ठाण्यात ४० वर्षीय शिक्षिकेविरोधात भादवी ३२३, ५०६, ज्यूवेनाईल जस्टीस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३६ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
चिमुकलीची वडिलांकडे तक्रार
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांची तीन वर्षाची मुलगी कोथरूड परिसरातील एका नामांकित शाळेत शिकत आहे. दरम्यान अंजना टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्चे घेतात, हात कापू का, तुला मेणबत्तीचे चटके देईन, आणि घरच्यांना सांगायचे नाही असे सतत म्हणत असतात. अशी तक्रार या चिमुरडीने वडिलांकडे केली होती.
वडिलांनी पोलिसांत घेतली धाव
चिमुरडीची तक्रार ऐकताच वडिलांनी लगेचच पोलीस स्टेशन गाठत यासंबंधी तक्रार दिली. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पांढरे अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शाळेत मुलांना अशाप्रकारे धमकी देणे हे चिंताजनक असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.