तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ १४ वर्षापासून निधीपासून वंचित

0
22

मंत्री गिरीष महाजनांकडे अध्यक्ष डी. डी. पाटील यांचे निवेदनाद्वारे साकडे

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

गेल्या १४ वर्षापासून जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ कार्यरत आहे. मंडळातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरवून मंडळातर्फे साहित्यिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, शासनाकडून कोणताही भरीव निधी आजपर्यंत मंडळाला मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे साकडे साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डी.डी. पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट नुकतीच घेऊन निवेदन दिले आहे. दरम्यान, मागणीचा पाठपुरावा करून शासनाकडून निधी मिळवून देऊ, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मंडळाचे सभासद व देणगीदार यांच्या देणगीतूनच आतापर्यंत संस्थेचा कार्यभार सुरु आहे. मंडळातर्फे नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देऊन कवी संमेलने, कथा संमेलन, हवशी कलाकारांचा सत्कार समारंभ, साहित्यिकांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे, खान्देशी, तावडी व अहिराणी भाषेबाबत प्रबोधन,विविध स्पर्धा आयोजित करून बक्षिसे वितरण करणे, असे विविध उपक्रम मंडळामार्फत गेल्या १४ वर्षापासून राबवित आहे. संस्था नोंदणीकृत आहे. ज्या संस्थेला पाच वर्षे पूर्ण झाली. त्यांना शासन निधी देते. मग जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे एवढे मोठे भरीव कार्य असतांना मंडळाच्या स्थापनेला १४ वर्ष पूर्ण होऊनही निधी मिळत नाही. यासाठी शासनाने निधीची तरतूद करून द्यावी, अशी मागणीही निवेदनात नमूद आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची गरज

तसेच स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कामही शहरातील वाकी रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरपालिकेमार्फत ओपन स्पेस जागा देऊन त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र निर्माण करून द्यावे, अशी मागणीही केली आहे. परिसरातील वयोवृद्ध पेन्शनधारक नागरिकांना विरंगुळा दूर करण्यासाठी तसेच विचारांची देवाण-घेवाण व शारीरिक थकवा घालविण्यासाठी केंद्राची अत्यंत गरज आहे. त्याचाही विचार मंत्री महाजन यांनी करावा, अशी मागणीही केली आहे.

महालक्ष्मी मंदिर उभारण्याचा संकल्प

महालक्ष्मी देवी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा लक्ष्मी मातेचे मंदिर उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन मदत करावी. शहरात महालक्ष्मी देवीचे एकही मंदिर नसून ट्रस्टतर्फे महालक्ष्मी मंदिर उभारण्याचा संकल्प आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी मंत्री महाजन यांनी सहकार्य करावे. अशा सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सहकार्य करू,असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here