राष्ट्रीय महामार्गावर सकल धनगर समाजातर्फे रास्ता रोकोचा इशारा
साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव :
गोरगरीब मेंढपाळ लोकांकडून शिवार चराईच्या नावाने अन्यायकारक रितीने वसुली करणाऱ्या मेहुणबारे येथील पीक संरक्षक सहकारी सोसायटीवर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन येथील सकल धनगर समाजाच्यावतीने मेहुणबारे येथील सहायक पोलीस निरीक्षक यांना नुकतेच देण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील पीक संरक्षण सोसायटी संस्थेचा नोंदणी क्रमांक १२०३५ व नोंदणी ३० ऑगस्ट १९४७ आहे. संस्थेचे मुख्य कार्य शिवारातील शेत जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे, पिकांचे, झाडाझुडपांचे, इलेक्ट्रिक पंपाचे, इतर मालमत्तेचे चोर व सुनाट गुरांपासून संरक्षण करणे आहे. त्याकामी आवश्यक असणाऱ्या उपायोजना करणे, पिकांच्या संरक्षणासाठी रखवालदार नेमणे व जरुरीनुसार भाले, लाठ्या इत्यादी विकत घेणे व त्यांना पुरविणे अशा उद्देशासाठी संस्था स्थापन केली होती. असे असताना संस्थेने २७ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या ठरावानुसार,.धनगर व काठेवाडी यांना चराई देऊन शिवारात चालतीचे वाडे, मेहुणबारे शिवारात आल्यास १ दिवसासाठी ५०० रुपये शिवार चराई पावती करावी, असा अन्यायकारक ठराव पारित केलेला आहे. गोरगरिब मेंढपाळांकडून त्यांना शिवार चरायची पावती न देता, कोणाकडून २०० रुपये कुणाकडून ९०० रुपये घेतले जातात. त्याबाबत विचारले असता उद्धटपणे आणि उर्मटपणे उत्तरे दिली जातात. प्रसंगी पैसे देण्यास नकार दिला असता शेळ्या-मेंढ्या पळवल्या जातात. कधी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली जाते. असे प्रकार सर्रास होत आहेत.
अन्यायकारक वसुली तात्काळ थांबविण्यात यावी
गोरगरीब मेंढपाळ लोकांचे चालतीचे वाडे आल्यास त्यांच्याकडून वर नमूद केल्याप्रमाणे बेकायदेशीररित्या शिवार चराई नावाने अन्याय कृतीने वसुली केली होती. याप्रकरणी आपणाकडे 3 जुलै 2024 रोजी लेखी तक्रार देऊनही अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही. संस्थेविरुद्ध शिवार चरायचे नावाखाली सुरू असलेली अन्यायकारक वसुली तात्काळ थांबविण्यात यावी, योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे न झाल्यास पुढील पंधरा दिवसाचे आत मेहुणबारे राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगाव तालुका धनगर समाजाच्यावतीने शेळ्या, मेंढ्यांसहित रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन जबाबदार राहील.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर संदीप लांडगे, नवनाथ ढगे, संजय गढरी, आबा रावते, संदीप येवसकर, योगेश निकम, दादाजी जाधव, भोजू जाधव, गणपत जाधव, नाना शेलार, काळू जाधव, चींधा शेलार, भटा जाधव, राजू जाधव, यदराज जाधव,गुलाब सोनवणे, कौतिक जाधव, महेंद्र जाधव, शिवाजी जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.