घंटागाड्या बंद ठेवल्याने स्वयंभूला ठोठावला दंड

0
6

साईमत : धुळे : प्रतिनिधी

शहरातील घनकचरा संकलनाचे काम एक दिवस बंद ठेवल्याने कचरा संकलन करणाऱ्या स्वयंभू ट्रान्स्पोर्टला महापालिका प्रशासनाने एक लाख २६ हजार रुपये दंड ठोठावला.दरम्यान, संस्थेला केलेला दंडामुळे कामात सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे दंडाची रक्कम भरून संस्था मोकळ्या होतात. त्यापेक्षा कितीतरी पटीने बिल वसूल केले जाते. त्यामुळे दंडाला या संस्था आता घाबरत नाहीत अशी परीस्थिती निर्माण झाली आहे.

शहरातील घरस्तरावरील घनकचरा संकलनाचे काम महापालिकेने स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे या संस्थेला दिले आहे. साधारण दीड वर्षापासून संस्था धुळे शहरात काम करत आहे.त्यापूर्वी वॉटरग्रेस कंपनी हे काम करत होती. वॉटरग्रेसला महापालिकेने बाद केल्यानंतर हे काम स्वयंभू ट्रान्स्पोर्टला देण्यात आले आहे. मात्र, पुन्हा एकदा या संस्थेबाबत तक्रारी होत आहेत.
नागरिकांच्या तक्रारींचा संदर्भ घेत नगरसेवक, पदाधिकारी तक्रारींसह संबंधित संस्थेवर गंभीर आरोप करतात.नंतर त्या आरोपांचे काय होते हे कुणालाही समजत नाही. प्रशासनाकडूनही या तक्रारी, आरोपांबाबत गांभीर्याने दखल घेतली जात नाही. परिणामी काही दिवस, काही महिन्यांनी पुन्हा तशीच स्थिती उद्‍भवते. संबंधित संस्था अशा आरोपांना आता भीक घालत नाहीत शिवाय प्रशासनाकडून होणाऱ्या दंडात्मक कारवाईलादेखील या संस्था घाबरत नाहीत अशी स्थिती पाहायला मिळते.

कचरा संकलन करणाऱ्या स्वयंभू ट्रान्स्पोर्टने ७ सप्टेंबर २०२३ ला घरस्तरावरील घनकचरा संकलनाचे काम पूर्णपणे बंद ठेवले. तसा अहवाल महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी वरिष्ठांकडे सादर केला. या अहवालावरून करारनाम्यातील अटी-शर्तीनुसार प्रतिघंटागाडी दोन हजार रुपये याप्रमाणे ६३ घंटागाड्या बंद ठेवल्याने स्वयंभू ट्रान्स्पोर्टला एकूण एक लाख २६ हजार रुपये दंड करण्यात आला.दंडाची ही रक्कम ऑगस्ट-२०२३ च्या बिलातून कपात करण्यात येईल, असे प्रशासनाने स्वयंभू ट्रान्स्पोर्टला नोटिशीद्वारे कळविले आहे. प्रशासनाकडून अशी दंडात्मक कारवाई नियमितपणे होत असते. या कारवाईचा संबंधित संस्थांना किती फरक पडतो, कारवाईनंतर कामात सुधारण होते का, असा प्रश्‍न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here