साईमत, नाशिक : प्रतिनिधी
कांदा दरवाढीच्या भीतीने केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट असून विविध ठिकाणी शेतकऱ्यांसह राजकीय संघटनांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यातील वणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सुरत-शिर्डी महामार्ग रोखला आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. याव्ोळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारच्या शासकीय आदेशाची होळी देखील करण्यात आली. दरम्यान, याव्ोळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केंद्र सरकारला महागाई दर कमीच करायचा असेल तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा. शेतकऱ्यांच्या शेतमालावरच तुमचा डोळा का? असा संतप्त सवाल विचारला आहे.