साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुनील सुपडू महाजन यांची तर उपसभापतीपदी जयराज जिजाबराव चव्हाण यांची निवड झाल्याचे सभेचे पिठासिन अधिकारी सहाय्यक निबंधक धर्मराज पाटील यांनी जाहीर केले.
बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडीसाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवारी, २९ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. सभापती पदासाठी संचालक सुनील महाजन, संचालक लक्ष्मण पाटील (लकी टेलर) आणि संचालक मनोज दयाराम चौधरी असे तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, मनोज चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सुनील महाजन आणि लक्ष्मण पाटील यांच्यासाठी संचालकांचे मतदान झाले. त्यात सुनील महाजन यांच्या बाजूने १५ संचालकांनी तर लक्ष्मण पाटील यांना दोन संचालकांची मते मिळाली. त्यामुळे पिठासिन अधिकारी श्री. पाटील यांनी सभापतीपदी सुनील महाजन विजयी झाल्याचे घोषित केले.
उपसभापतीपदी चव्हाण बिनविरोध उपसभापतीपदासाठी संचालक जयराज जिजाबराव चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे पिठासिन अधिकारी यांनी जाहीर केले.